जुन्या हायकोर्ट इमारतीची झाली दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:59+5:302021-06-21T04:06:59+5:30
वसीम कुरेशी नागपूर : उपराजधानीत स्वातंत्र्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या आलिशान जुन्या हायकोर्ट इमारतीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासीक ...
वसीम कुरेशी
नागपूर : उपराजधानीत स्वातंत्र्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या आलिशान जुन्या हायकोर्ट इमारतीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासीक वास्तू म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या इमारतीची दुरवस्था होत आहे. मागील वर्षी पावसामुळे या इमारतीच्या पोर्चचा एक भाग कोसळला. तो अद्याप दुरुस्त करण्यात आला नाही. इमारतीच्या आत बल्ली लावून या इमारतीचे छत सुरक्षित करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये नागपूर सर्कल कार्यालय तयार झाल्यानंतर नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात एएसआय विकास कामे करण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु नागपूर शहरातील ऐतिहासिक इमारतीच्या देखभालीतही एएसआय अयशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. या इमारतीला मूळ स्वरुप देण्यासाठी निविदा काढण्यात आली. परंतु कंत्राटदाराने त्यात रस दाखविला नाही. शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. परंतु शहरातील एका ऐतिहासिक इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या इमारतीच्या देखभालीचा मुहूर्त कधी निघतो हा प्रश्न अनेक दिवसांपासून कायम आहे. पुन्हा पावसाळा येऊन ठेपला असताना जर्जर झालेल्या जुन्या हायकोर्ट इमारतीबद्दल पुरातत्त्वप्रेमी चिंता व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या काळात पहिल्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत एएसआयचे कामकाज ठप्प झाले असून आतासुद्धा नव्या प्रकल्पावर काम होताना दिसत नसल्याची स्थिती आहे.
..........
जुन्या हायकोर्ट इमारत परिसरात योग दिन
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय २१ जूनला योग एक भारतीय संस्कृती अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत आहे. त्यानुसार देशातील ७५ सांस्कृतिक स्थळांवर आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात त्यासाठी चार ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यात आगा खान महल पुणे, कन्हेरी गुफा मुंबई, एलोरा गुफा आणि जुने उच्च न्यायालय भवन नागपूरचा समावेश आहे. येथे सकाळी ७ ते ७.३० दरम्यान योग करण्यात येईल. त्यानंतर संगीत-नाटक अकादमीचे सादरीकरण आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ८.१५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
..................