भरधाव ट्रकने आजाेबासह नातवाला उडविले; सून गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 12:50 PM2022-05-04T12:50:19+5:302022-05-04T12:57:03+5:30
ते कामठी शहरातील हैदरी चाैकात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली.
कामठी (नागपूर) : डाेळ्यांची तपासणी करण्यासाठी कामठी शहरातील नेत्रतज्ज्ञांकडे जात असलेल्या सेवानिवृत्त पाेलीस अधिकाऱ्याच्या ॲक्टिव्हाला विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या टिप्परने जाेरात धडक दिली. त्यात या आजाेबांसह तीनवर्षीय नातवाचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात कामठी शहरातील हैदरी चाैकात मंगळवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये आजाेबा रामदास परसराम वनकर (६५) व नातू त्रिशांत राकेश वनकर (३) या दाेघांचा समावेश असून, या अपघातात सून दामिनी राकेश वनकर (४५) या गंभीर जखमी झाल्या. वनकर कुटुंबीय गजानन नगर, पिपळा फाटा, नागपूर येथील रहिवासी आहेत. रामदास वनकर यांना त्यांच्या डाेळ्यांची तपासणी करायची असल्याने ते सून दामिनी व नातू त्रिशांत यांना साेबत घेऊन ॲक्टिव्हाने कामठी शहरातील नेत्रतज्ज्ञाकडे येत हाेते. ते कामठी शहरातील हैदरी चाैकात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. या धडकेमुळे ॲक्टिव्हावर मागे बसलेल्या दामिनी दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या, तर रामदास व त्रिशांत टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात हाेताच नागरिकांनी टिप्परचालक जितेंद्र अमरकथक भोंगाडे (२४, रा. सालई बु., ता. मोहाडी, जिल्हा भंडारा) याला पकडून ठेवले. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेताच त्याला पाेलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कामठी पाेलिसांनी भादंवि ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
रेती वाहतुकीचा टिप्पर व दगडफेक
रामदास वनकर हे सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी हाेते, तर त्यांचा मुलगा राकेश हा सैन्यात गुवाहाटी (आसाम) येथे नाेकरीला आहे. राकेश यांचा मुलगा त्रिशांत व पत्नी दामिनी त्यांच्या वडिलांकडे राहायचे. अपघाताला कारणीभूत ठरलेला टिप्पर कुरखेडा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा येथून रेती घेऊन कामठी शहरात आला हाेता. रेती खाली केल्यानंतर चालक परतीच्या प्रवासाला निघाला हाेता. अपघात हाेताच नागरिकांनी टिप्परवर दगडफेक केली. पाेलीस वेळीच घटनास्थळी आल्याने परिस्थिती चिघळली नाही.