'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 12:24 PM2022-03-10T12:24:20+5:302022-03-10T12:35:03+5:30

मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती.

old man organised an exhibition in his hut of mentioning women's activism on womens day | 'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याच्या विकासात जाणार कष्टाने थाटलेली झोपडी अन् बाग

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ज्याचे स्वत:चे घर नाही, चरितार्थ चालवायला कसलेच साधन नाही, कुटुंबात म्हणायला तरुण मुलगा आहे, पण तोही गतिमंद-दिव्यांग. संवाद साधायला तो आपला एकटाच. अशा व्यक्तीने महिला दिनाचा जागर करावा म्हणजे नवलच. हा कौतुकास्पद जागर करणारा अवलिया म्हणजे, खामला भाजीबाजार चौकात जयताळा मार्गाच्या कडेला आपली राहुटी उभी करणारा व तेथेच झाडा-फुलांची बाग फुलविल्याने सगळ्यांना आकर्षित करून घेणारा मोहन परमा कोरी हा होय. मात्र, त्याची ही झोपडी महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्याच्या विकासात विलीन होण्यास सज्ज झाली आहे.

गेल्या २३ वर्षांपासून याच ठिकाणी मुलाची सेवा शुश्रूषा करत स्वत:चे आयुष्य जगणारे मोहन हे साठीला टेकले आहेत, तर कसलीही संवेदना नसलेला त्यांचा राजकुमार हा मुलगा २५ वर्षांचा आहे. नववी उत्तीर्ण असलेले मोहन यांना वाचनाची आवड आहे. म्हणून ते वृत्तपत्रात झळकलेल्या इतरांच्या कर्तृत्वाच्या बातम्यांची कात्रणं कापून ठेवतात. कधीकाळी इकडून-तिकडून आलेला पैशाने त्या कात्रणांची लॅमिनेटेड फोटो कॉपी तयार करतात आणि दिनविशेषाला आदरांजली, अभिवादन, गौरव प्रदर्शन त्याच झोपडीत करतात.

मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती. काही दिवस हे प्रदर्शन असे राहणार होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी सिमेंट रस्त्याच्या फुटपाथ निर्मितीसाठी ही जागा खोदावी लागणार असल्याचे सांगितले गेले आणि ते प्रदर्शन संपविण्यात आले. हा एक विसंयोगच म्हणावा लागेल. रस्त्याच्या या विकासात त्यांनी फुलवलेली बाग आणि झोपडी विलीन होणार आहे.

बाप मुलाची करतो सेवा शुश्रूषा!

नशिबाच्या रेषा कपाळावर नाही तर हाताच्या कर्तृत्वावर अवलंबून असतात हे जरी खरे असले, तरी नियतीच्या फेऱ्यापुढे सारेच हतबल आहेत. ज्या वयात मुलाने बापाची काळजी घ्यावी, त्याच वयात तरण्याबांड पोराची सेवा शुश्रूषा करण्याचे भोग मोहन परमा कोरी यांच्यावर आले. आता किमान माझी ही राहुटी व बाग तरी राहू द्या, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

केवळ फोटोसेशन!

कोरी यांची व्यथा बघून, काहीच जण त्यांना नियमित मदत करतात. अनेक समाजसेवक केवळ फोटोसेशनपुरता कळवळा दाखवतात आणि निघून जातात. या बाप-मुलाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी मात्र कुणीच पार पाडत नाही, हे दुर्दैव आहे.

Web Title: old man organised an exhibition in his hut of mentioning women's activism on womens day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.