नागपूरच्या फुटाळा तलावातून निघाल्या जुन्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:25 PM2018-05-31T22:25:20+5:302018-05-31T22:25:36+5:30
महापालिकेतर्फे फुटाळा तलावातील गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तलावातील गाळासोबतच जुन्या ५०० व १००० रुपयाच्या नोटांचे बंडल बाहेर आले. ही रक्कम पाच लाखांची असल्याचे सांगण्यात आले. नोटा बंदीनंतर चलनातून बाद झालेल्या या नोटा नष्ट करण्यासाठी तलावात फेकण्यात आल्या असाव्या व तलावातील गाळात आणखी नोटा सापडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे फुटाळा तलावातील गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तलावातील गाळासोबतच जुन्या ५०० व १००० रुपयाच्या नोटांचे बंडल बाहेर आले. ही रक्कम पाच लाखांची असल्याचे सांगण्यात आले. नोटा बंदीनंतर चलनातून बाद झालेल्या या नोटा नष्ट करण्यासाठी तलावात फेकण्यात आल्या असाव्या व तलावातील गाळात आणखी नोटा सापडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने स्वच्छता करणारे कर्मचारी चकित झाले. त्यांनी याची माहिती उपमहापौर दीपराज पार्डीक र यांना दिली. पार्डीकर यांनी अपर आयुक्त शांतनू गोयल यांना यासंदर्भात माहिती दिली. सापडलेल्या जुन्या नोटांवर बंदी असल्याने प्रकरण पोलीस विभागाशी संबंधित असल्याचे गोयल यांनी सांगितले. तसेच धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोराणे यांना फोन करून फुटाळा तलावावर जाण्यास सांगितले. परंतु मोरोणे रजेवर असल्याने कार्यभार सांभाळणारे विजय हुमणे यांना पाठविण्यात आले. थोड्याच वेळात अंबाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस तलावावर पोहचले. त्यांनी पंचनामा करून तलावात सापडलेल्या नोटा ताब्यात घेतल्या.
गेल्या काही दिवसापासून आयुक्त वीरेंद्र सिंग स्वत: फुटाळा तलावाच्या स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. तलाव स्वच्छ करण्याचे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहे. तलावातील कचरा काढण्याचे व वाहून नेण्याचे काम महापालिका करीत आहे. मात्र तलावातून जलपर्णी व गाळ काढताना स्वच्छतेच्या कामात अडचणी येत आहे. याचा विचार करता तलाव स्वच्छ करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांने पोहता येणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून तलाव स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी १० ३० च्या सुमारास कामगारांनी कामाला सुरूवात करताच तलावात नोटांचे बंडल आढळून आले.
तलावात आणखी नोटा असण्याची शक्यता
फुटाला तलावातील गाळ काढताना कामगारांना जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. ही रक्कम पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तलावाच्या गाळात आणखी नोटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावातील गाळ व कचरा काढताना पुन्हा नोटा मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पंचनामा करून सापडलेल्या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या आहे.
दीपराज पार्डीकर, कार्यकारी महापौर