मनपा अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा समावेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:45 PM2020-10-19T23:45:02+5:302020-10-19T23:46:43+5:30
NMC Budget, Nagpur news जुन्याच योजनांचा समावेश असलेला मनपाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे मागील सहा महिन्यात महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. पुढील पाच महिन्यात यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही. जीएसटी अनुदानात वाढ झाल्याने थोडा दिलासा मिळाला तरी अन्य बाबीसाठी अपेक्षित शासकीय अनुदानात वाढ होण्याची शक्यता नाही. जुन्याच योजनांचा समावेश असलेला मनपाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. तर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी २५२३.८२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर करून विकास कामांना ब्रेक लावले होते. यात कार्यादेश झालेल्या कामांचाही समावेश होता.
यावर्षीचा अर्थसंकल्पही ३२०० कोटींच्या आसपास राहील. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर कार्यान्वित होईल. जानेवारीत आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प येण्याची शक्यता आहे. याचा विचार करता स्थायी समिती अध्यक्षांना दोन ते तीन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
प्रलंबित कामासाठी तरतूद
रखडलेले तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोड, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, प्रभागातील विकास कामे, तलाव दुरुस्ती व संवर्धन, शहरातील विद्युत खांब हटविणे, डीपी रोड, बुधवार बाजार, ऑरेंज सिटी स्ट्रीट एलईडी दिवे यासह अन्य प्रलंबित कामांसाठी निधीची तरतूद करावी लागणार आहे.
बिकट आर्थिक स्थितीचा फटका
अर्थसंकल्पात घोषणा केल्या जातात. परंतु त्या पूर्णत्वास जात नाही. कोरोनामुळे मनपाला आर्थिक फटका बसला. याचा विचार करता नवीन योजनांची घोषणा न करता प्रलंबित योजना पूर्णत्वास नेण्यावर भर देण्याचे संकेत स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिले आहे.