जुन्या गाण्यांचा काळ लवकरच येणार
By Admin | Published: October 4, 2015 03:24 AM2015-10-04T03:24:20+5:302015-10-04T03:24:20+5:30
आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, ..
आजच्या गाण्यात गोंगाटच अधिक :
संगीतकार रवींद्र जैन यांचा विश्वास
नागपूर : आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, असा विश्वास प्रख्यात संगीतकार डॉ. रवींद्र जैन यांनी शनिवारी व्यक्त केला.
बादल आर्टस् व स्वरमधूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित ‘अखियों के झरोको से...’ या कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जैन पुढे म्हणाले, आजचे तरुण कलाकार एका रात्रीतून स्टार बनण्याचे स्वप्न पाहात आहेत. परंतु ते योग्य नाही. त्यांनी धैर्य राखले पाहिजे. शॉर्टकटचा मार्ग कधीही धोक्याचा असतो. त्यामुळे तरुणांनी अगोदर संगीतात पारंगत झाले पाहिजे.
त्यासाठी चांगल्या गुरू कडे शिक्षा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या ते ‘तानसेन’ हा चित्रपट तयार करीत असून, या चित्रपटातील संगीत व दिग्दर्शन त्यांचे राहणार आहे. रवींद्र जैन यांचे वडील पंडित इंद्रमणी जैन संस्कृतमधील विद्वान व आयुर्वेदाचार्य होते.
नागपूरविषयी बोलताना, या शहराशी आपला फारच घनिष्ठ संबंध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील महालेखाकार कार्यालयात त्यांचे मोठे बंधू डी.के. जैन नोकरीला होते, असेही ते म्हणाले. डॉ. रवींद्र जैन यांना पद्मश्री व फिल्मफेअर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
उद्या देशपांडे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात रवींद्र जैन यांनी संगीत दिलेल्या लोकप्रिय गीतांसह संगीताशी निगडीत त्यांच्या जीवनातील रहस्यांचे पैलू उलगडले जाणार आहेत. या कार्यक्रमात गायक राजेश दुरुगकर, राजू व्यास, श्रद्धा जोशी, आकांक्षा नगरकर, रिजवान साबरी, अरुण बोडे व संजय इंगळे विविध लोकप्रिय गाणे सादर करतील. (प्रतिनिधी)