नागपुरातील एसीपी कार्यालयात ओली पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:16+5:302021-03-20T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सहायक पोलीस आयुक्त (एसीपी)च्या कार्यालयात ओली पार्टी करणाऱ्या तीन पोलिसांना गुरुवारी उशिरा रात्री निलंबित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहायक पोलीस आयुक्त (एसीपी)च्या कार्यालयात ओली पार्टी करणाऱ्या तीन पोलिसांना गुरुवारी उशिरा रात्री निलंबित करण्यात आले.
शांती नगरातील एका मालमत्तेच्या विक्री प्रकरणाचा वाद या ओल्या पार्टीमागे आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. यातील तक्रारदार विकास खेडकर यांनी गैरअर्जदारावर कारवाई व्हावी यासाठी वारंवार शांतिनगर पोलिसांकडे आणि वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र गैरअर्जदारावर कारवाई झाली नाही. यासंबंधाने विचारले असता, संबंधित पोलिसांनी त्यांना पार्टीची मागणी केली. त्यानुसार खेडकर यांनी ३ मार्चला रात्री एसीपी कार्यालयात बसणारे एएसआय गणेश लाडे, नायक शिपाई रत्नाकर आणि प्रदीप यांना दारू आणि मटणाची पार्टी दिली. पार्टीत सहभागी होतानाच एका सहकाऱ्याकडून पार्टीचा व्हिडिओ तयार करून घेतला. हा व्हिडिओ बुधवारी रात्री व्हायरल झाला.
दरम्यान, फिर्यादी खेडकर यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे गुरुवारी तक्रार केली. सोबत व्हिडिओसुद्धा पाठविला. त्याची तत्काळ दखल घेत आयुक्तांनी पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपायुक्त नीलोत्पल यांनी फिर्यादी तसेच ओल्या पार्टीत सहभागी झालेल्या पोलिसांचे बयान नोंदविले. व्हिडिओच्या स्वरूपातील भक्कम पुरावा असल्यामुळे उपरोक्त तिघांना निलंबित करण्यात आले.
---
अशांत शांतिनगर
विशेष म्हणजे शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि गुन्हेगार आहेत. त्यामुळे शांतिनगर नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी शांतिनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे तेथील अर्धा डझनपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील झाली होती. नंतर हत्या प्रकरणातील एका आरोपीला ढाब्यावर जेवण दिल्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती.
---