ओलसावली म्हणजे स्त्री-पुरुष नात्याचे भावबंध
By admin | Published: August 3, 2014 12:56 AM2014-08-03T00:56:18+5:302014-08-03T00:56:18+5:30
आपल्या देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने स्थित्यंतरे घडत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आजही बदललेली दिसत नाही ती म्हणजे स्त्री-पुरुष नात्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन.
पुस्तक प्रकाशन समारंभात लेखिका नीरजा यांचे प्रतिपादन
नागपूर : आपल्या देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने स्थित्यंतरे घडत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आजही बदललेली दिसत नाही ती म्हणजे स्त्री-पुरुष नात्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन. परंतु प्रेयसी वा पत्नीशिवायही एका पुरुषाचा एका महिलेशी संबंध असू शकतो. त्या संबंधालाच आम्ही मैत्री म्हणतो. स्त्री-पुरुष मैत्रीचे हेच विविध पदर ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांच्या ओलसावली या ललितबंधात आले आहेत.
लेखकाने स्त्री-पुरुष नात्यातील तरल भावबंध अतिशय हळव्या शब्दात या पुस्तकात मांडले आहेत. म्हणूनच या पुस्तकातील प्रत्येक ओळ, ओळीतला प्रत्येक शब्द थेट वाचकांच्या मनाला भिडतो, असे प्रतिपादन प्रसिद्धी कवयित्री व लेखिका नीरजा यांनी केले. जागतिक मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आधार व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओलसावली पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी संदीप खरे, गुरू ठाकूर, प्रशांत असनारे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी उपस्थित होते.
नीरजा पुढे म्हणाल्या, ओलसावली हा ललितबंध लेखकाने अनुभवलेल्या दुभंग आणि सुगंधात विभागलेला आहे. जीवनात भेटणाऱ्या सखीला वाहिलेले हे पुस्तक आहे. कुठलेही ललित लिहिणे हे सोपे काम नाही. इतर कुठल्याही लिखाणापेक्षा थकवून टाकणारे हे काम असते. कारण, लेखनातील अस्सलता ललितबंधात व्यक्त होत असते, याकडेही नीरजा यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी मनोहर म्हैसाळकर यांचा ८१ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने या प्रकाशन समारंभात त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.
(प्रतिनिधी)