अबब! विष्णू मनोहर यांनी शिजविली १५०० किलो भाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:18 AM2019-02-11T10:18:57+5:302019-02-11T10:20:49+5:30
नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. विष्णू यांनी हा भव्य उपक्रम कुठल्याही विक्रमासाठी केला नाही, तर नागपुरकरांना विषमुक्त अन्न मिळावे, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सेंद्रिय उत्पादनाची चव नागपूरकरांना व्हावी, या उद्देशातून १५०० किलोची भाजी शिजविली.
बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे सकाळी ६.३० वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा करून त्यांनी भाजी शिजवायला सुरुवात केली. सखे सोबती फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दीड हजार किलो भाजी शिजेल एवढी मोठी कढई, १० फुटाचा सराटा, शेकडो किलो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मसाले, खाद्यतेलाचा वापर करून चार तासात त्यांनी भाजी शिजविली. हे सर्व प्रीपरेशन गोवºया आणि लाकडांवर करण्यात आले. विष्णू यांनी केलेल्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. १० वाजताच्या सुमारास भाजी तयार झाली. आमदार गिरीश व्यास, मनसेचे प्रवक्ते हेमंत गडकरी, राजे मुधोजी भोसले यांच्या उपस्थितीत उपस्थितांना त्याचे वितरण करण्यात आले.
अनेकांनी विष्णू यांनी तयार केलेल्या भाजीचा आस्वाद घेतला, काही कुटुंबीयांसाठीही घेऊन गेले. विष्णू यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि धन्यवादही दिले.
सर्वकाही नैसर्गिक
दीड हजार किलोच्या भाजीत १२० किलो गांजर, १७५ किलो बटाटे, १०० किलो कांदे, अद्रक, लसूण, मिरची प्रत्येकी ५० किलो, १०० किलो सांभार, १०० किलो कोबी, १०० किलो वांगे, टोमॅटो १५०, मेथी २५ यासह मसाले व १५० किलो खाद्यतेलाचा वापर करण्यात आला होता. ‘फार्म २ फ्रीज’ या संस्थेकडून सर्व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्यात आला होता.
खूप टेस्टी झाली
विष्णू यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्व खवय्येगिरीच्या उपक्रमात आम्ही सहभागी होतोे. त्यांनी केलेली खिचडी, हलवाही खाल्ला. त्यांच्या हातची भाजीही खूपच टेस्टी झाली आहे. जे काही भव्यदिव्य ते करताहेत, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे आणि आम्हालाही त्यांच्या हातचे खायला मिळत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी केलेला हा उपक्रम अभिमानास्पद आहे.
-वृषाली दारव्हेकर