मुंबई, पुण्यात ऑटोरिक्षा मीटरवर, नागपुरात का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:50 PM2024-11-29T16:50:11+5:302024-11-29T16:56:40+5:30
दोन वर्षांपूर्वी भाड्यात दरवाढ, तरीही प्रवाशांची लुबाडणूक : कारवाईची मोहीम कोण हाती घेणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणे, मुंबईत ऑटोरिक्षा मीटरने धावत असताना नागपूरसारख्यामेट्रो शहरात ऑटोरिक्षाचे मीटर जामच आहे. विशेष म्हणजे, रिक्षाचे परमिट मिळविताना नागरिकांना मीटरप्रमाणे वाहतूक करण्याचा कायदा आहे. परंतु नागपुरात जवळपास ३७ हजारांच्या घरात असलेल्या ऑटोरिक्षा सर्रास मीटर बंद ठेवून प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वाहतूक विभागापासून ते परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा भाड्यामध्ये १६ जून २०२२ रोजी दरवाढ केली. या मागे पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे देण्यात आली. भाडेवाढीच्या दृष्टीने ऑटोरिक्षांचे 'मीटर कॅलिब्रेशन' करण्यासाठी ६० दिवसांची मुदतही दिली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी होऊनही ऑटोचे मीटर जामच आहे. ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न होत नसल्याचे, शिवाय बहसंख्य प्रवासी तक्रारीही करीत नसल्याने ऑटोरिक्षा चालकांचे चांगलेच फावत आहे.
२०१४ मध्ये केली होती मीटरसक्ती
नागपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी आरटीओकडून बरेच प्रयत्न झाले. २०१४ मध्ये मीटरनेच चालण्याची सक्तीही करण्यात आली. सुमारे ७०० ऑटोरिक्षांवर जप्तीची कारवाई झाली. या विरोधात ऑटोरिक्षा चालकांनी संपही पुकारला होता. मात्र, पुढे ही मोहीम थंडबस्त्यात गेली, २०२२ मध्ये प्राधिकरणाने प्रवासी भाड्यात दरवाढ करूनही ऑटो मीटरने चालण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येते. आरटीओच्या तपासणीत एखादेवेळी मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षावर कारवाई होते, परंतु ती वरचेवर होत नाही. वाहतूक पोलिसही याला गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे कारवाईचा धाक नसल्याचेही चित्र आहे. कारवाईची मोहीम कोण हाती घेणार, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
असे आहे मीटरचे भाडे
नव्या टेरीफ कार्डनुसार प्रति कि. मी. करिता १८ रुपये भाडे तर १.५ कि.मी. करिता २७ रुपये भाडे आकारण्याचा नियम आहे. हे टेरीफ कार्ड ऑटोचालकांच्या फायद्याचे आहे. परंतु अनेक प्रवासी सीटनुसार प्रवास करण्यास अडून बसतात. यामुळे मीटर फक्त नावापुरतेच असल्याचे, ऑटोचालकांचे म्हणणे आहे.
मीटरला नकार दिल्यास १,५०० दंड
मीटरनुसार चलण्यास नकार देणाऱ्या ऑटोचालकाच्या विरुद्ध तक्रार केल्यास आरटीओ १,५०० रुपये दंड ठोठावते. परंतु आरटीओकडे याविषयी तक्रारी नाहीत, यावरून शहरात मीटरविषयी जनजागृती नसल्याचा हा पुरवा आहे.