दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 04:09 PM2023-11-15T16:09:59+5:302023-11-15T16:10:23+5:30
शेमडा शिवारातील घटना : सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नागपूर : दिवाळीनिमित्त पाहुणा म्हणून आलेला नातू आजाेबासाेबत शेतात गेला. मात्र, कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्याने दाेघांनाही विजेचा जाेरात धक्का लागला. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील शेमडा शिवारात दिवाळीच्या दिवशी (रविवार, दि. १२) दुपारी ३:३० ते सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
बारीकराम फदाली कडवे (८०, रा. शेमडा, ता. नरखेड) व तुषार अरुण डाेंगरे (९, रा. वडचिचाेली, ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृत आजाेबा व नातवाचे नाव आहे. तुषार हा बारीकराम यांच्या मुलीचा मुलगा असून, ताे त्याची आई व वडिलांसाेबत दिवाळीनिमित्त आजाेबाकडे पाहुणा म्हणून आला हाेता. आजाेबा शेतात जात असल्याने तुषारही त्यांच्यासाेबत शेतात गेला हाेता. अनावधानाने तुषारचा स्पर्श शेताच्या कुंपणाला लावलेल्या तारेला झाला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का बसला.
आजाेबाने त्याला पकडताच त्यांनाही जाेरात विजेचा धक्का लागला. दाेघेही काही वेळ शेताजवळ पडून हाेते. ते शेजारच्या शेतकऱ्याला दिसताच त्याने बारीकराम यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी मृत तुषारचे मामा गजानन बारीकराम कडवे (२६) याच्या तक्रारीवरून मृत बारीकराम कडवे यांच्याविराेधात भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध)अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार कृष्णकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक सारिका गुरुकर करीत आहेत.
वन्यप्राण्यांऐवजी घरच्या सदस्यांचा गेला जीव
शेमडा शिवारात अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते पिकांची नासाडी करीत असल्याने तसेच वारंवार मागणी करूनही वन विभाग वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करीत नाही. यात शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत असून, वन विभाग नुकसानभरपाईपाेटी त्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवतो. पिकाचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे म्हणून बारीकराम कडवे यांनी शेताला तारांचे कुंपण तयार केले आणि त्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला हाेता. त्या वीजप्रवाहामुळे वन्यप्राण्यांऐवजी त्यांचा व नातवाचा जीव गेला आहे.