दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका; खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ 

By नरेश डोंगरे | Published: October 16, 2022 07:10 PM2022-10-16T19:10:40+5:302022-10-16T19:11:19+5:30

दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका बसला असून खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ करण्यात आली आहे. 

On Diwali festival, the passengers have been hit financially and the fares have been hiked by ST as well  | दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका; खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ 

दिवाळीच्या दिवसात प्रवाशांना आर्थिक फटका; खासगी पाठोपाठ एसटीकडूनही भाडेवाढ 

googlenewsNext

नागपूर : कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा संप असे एकापाठोपाठ दोन फटके खाल्ल्याने आर्थिक घडी विस्कटलेली एसटी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आता कुठे जोमात धावत आहे; मात्र एसटीतील गर्दी वाढल्यामुळे की काय राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आता प्रवाशांच्या खिशाकडे नजर वळविली आहे. दिवाळीच्या सणात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात बसमध्ये गर्दी होत असल्याचे लक्षात घेत एसटीने चक्क १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला. यामुळे ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.

दसऱ्यापासून गावोगावचे व्यापारी मोठ्या संख्येत वेगवेगळ्या शहरात खरेदीसाठी धाव घेतात. दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांसोबतच प्रवासीही मोठ्या संख्येने आपापल्या गावांकडे, नातेवाईकांकडे जातात. त्यामुळे रेल्वे, खासगी बस, एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी वाढते. हे ध्यानात घेता रेल्वेने अतिरिक्त गाड्या, वन वे सुपरफास्ट चालवून त्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना अतिरिक्त शुल्काचा पर्याय पुढे केला आहे. खासगी प्रवासी वाहनांच्या (ट्रॅव्हल्स) चालकांनी दुप्पट, अडीचपट भाडे वसूल करण्याचा सपाटा लावला आहे.

या पार्श्वभूमीवर आता एसटीनेही २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या १० दिवसांत प्रवास करणाऱ्यांना बसची तब्बल १० टक्के भाडेवाढ करून प्रवाशांना आर्थिक फटका देण्याची तयारी चालवली आहे. ही भाडेवाढ अस्थायी स्वरुपाची आहे. ती १ नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार असल्याचे सांगितले जात असले तरी पुढे ती नियमित करण्याचाही विचार महामंडळ करू शकते, असे सूत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे गोरगरिबांची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसच्या (एसटी महामंडळ) संचालकांनी प्रवाशांच्या खिशावर नजर रोखल्याचे बोलले जात आहे. समाधानाची बाब म्हणजे, ही भाडेवाढ यात्रा स्पेशल, विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या अवधींची पास काढून प्रवास करणाऱ्यांना लागू होणार नाही; मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीकडून केली जाणारी तिकिटाची भाडेवाढ गोरगरीब प्रवाशांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरणार आहे.

अतिरिक्त गाड्या वाढविणार
नोकरदार मंडळींसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी दिवाळीच्या दिवसांत आपल्या माहेरी, सासरी आणि नातेवाईकांकडे जातात. त्यामुळे या दिवसांत प्रवाशांची गर्दी वाढते. सध्या नागपूर विभागातून १९५ तर अमरावतीतून ७१ बसेस धावतात. ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी जास्त असेल त्या मार्गावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात.



 

Web Title: On Diwali festival, the passengers have been hit financially and the fares have been hiked by ST as well 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.