मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उभारले ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प
By नरेश डोंगरे | Published: July 13, 2023 03:04 PM2023-07-13T15:04:42+5:302023-07-13T15:06:07+5:30
मारमझिरी, टाकू, जौलखेडा आणि दोडरामोहर रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प : विजेची आणि आर्थिक बचत होणार
नरेश डोंगरे
नागपूर : उर्जा समस्येवर पर्याय आणि पर्यावरणाला अनुकूल बनविण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने काही रेल्वे स्थानकांवर 'ऑन-ग्रिड सोलर पॉवर प्लांट' उभारले आहेत. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे मध्य रेल्वेला भविष्यात अनेक फायदे होणार असून, मोठ्या खर्चाच्या बचतीसह पर्यावरणास पोषक वातावरणही निर्माण होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मारमझिरी (एमजेडाय) आणि टाकू (टीएक्यू) रेल्वे स्थानकांवर दोन १० किलोवॅट ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. यावर ५,४४,००० रुपये खर्च झाला असून त्यामुळे दरवर्षी १ लाख, ७२ हजार, ५०० रुपयांची बचत होणार आहे.
जौलखेडा आणि दोडरामोहर या स्थानकावर प्रत्येकी ५ किलोवॅट क्षमतेचे दोन ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्याला २ लाख, ८९ हजार रुपये खर्च आला असला तरी त्यातून दरवर्षी ६८,५०० रुपयांचा खर्च वाचणार आहे. शिवाय ६५७० किलोवॅट उर्जेचीही बचत होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
या दोन प्रकल्पाव्यतिरिक्त नागपूर विभागाने उर्जेचा वापर कमीतकमी करून वातावरणाला प्रदुषण पोषक बनविण्यासाठी अतिरिक्त सौर उर्जेवर चालणाऱ्या आणखी काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार दोडारामोहर रेल्वे स्थानकावर पाणी उपसण्यासाठी ३ एचपीचा सोलर वॉटर पंप बसवला आहे. या सेटसाठी एकदाच केवळ १ लाख, ६० हजार रुपये खर्च आला असून त्यातून दरवर्षी ६,४०० किलोवॅट उर्जा आणि ६७ हजार रुपये खर्चाची बचत होण्याची अपेक्षा आहे. याच स्थानकावर १३, ५०० रुपये खर्चून स्वयंचलित फिरणारे दोन १२ वॅटचे पथदिवे बसविले
आहे. त्यातून वर्षाला ८५०० रुपयांची बचत अपेक्षित आहे.
उर्जेचा वापर १०.२५ टक्के कमी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कनेक्टेड लोड मे २०२२ मध्ये २०,१५६.७७ किलोवॅट होते. ते मे २०२३ मध्ये २०,२३६.४७ किलोवॅट वाढले असून उर्जा बचतीच्या या पर्यायी व्यवस्थेमुळे उर्जेचा वापर १०.२५ टक्के कमी झाला आहे.
कृती आराखडा तयार सुरू असलेल्या आर्थिक वर्षांत उर्जा संवर्धनासाठी आणखी असेच काही प्रकल्प ठिकठिकाणी उभारले जाणार असून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने त्यासाठी एक कृती आराखडा तयार केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.