पाऊस रजेवर, पिकांनी मान टाकली; पऱ्हाटीची वाढ खुंटली तर धानही सुकु लागला
By जितेंद्र ढवळे | Published: August 17, 2023 03:10 PM2023-08-17T15:10:35+5:302023-08-17T15:12:08+5:30
परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
नागपूर : दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. याचा फटका पिकांना बसतो आहे. नागपूर जिल्ह्यात रामटेक आणि मौदा तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र पावसाअभावी पिके कोमेजली आहेत.
रामटेक तालुक्यातील देवलापार कृषी मंडळाअंतर्गत ७९ गावे मोडतात. या परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने धानाचे पीक सुकत चालले आहे तर जमीनीला तडा जावू लागल्या आहे. याशिवाय पऱ्हाटीची वाढ खुंटली तर तुरीत पीकावर कचरा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे हा परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे.
देवलापार कृषी मंडळाअंतर्गत १११६०.८१ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात पेरणी करण्यात आली आहे. यात धान ८२६०.५५ हेक्टर, पऱ्हाटी १६६३.६० तर तूरीचा १२३६.६६ हेक्टर मध्ये पेरा झाला आहे. मात्र पावसाअभावी ७० टक्के पेक्षा जास्त पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पऱ्हाटी व तूर वगळता धानाचे पऱ्हे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रोवणी होणे गरजेचे होते. मात्र असे असतानाही येथील रोवणी केवळ ६५ ते ७० टक्केच झाली आहे.