'त्या' प्रश्नावर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक घेतला; उपमुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:46 AM2023-12-07T09:46:28+5:302023-12-07T09:47:14+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माईक घेत फडणवीसांनी स्वत: उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर - विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्या. आपसात समन्वय ठेवा. कोणत्याही पद्धतीने सरकारवर नामुष्की येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सहकारी मंत्र्यांना दिला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी, विरोधकांना टोलाही लगावला. दरम्यान, विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माईक घेत फडणवीसांनी स्वत: उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकताना जे पत्र त्यांना दिले ते पत्र समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ मंत्री यांची वेगळी बैठक रामगिरीवर झाली. एकेका मुद्द्यावर पत्र परिषदेत काय बोलायचे याची रणनीती ठरवण्यात आली होती. त्यामुळेच पत्रपरिषदेत तिघांमध्ये समन्वय दिसून आला. तिघांपैकी कोणी कोणत्या विषयावर बोलायचे हे आधीच ठरलेले होते. त्यानुसार पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, एका प्रश्नावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक घेत स्वत: उत्तर दिलं.
केंद्र सरकारने दिलेल्या डेटासंदर्भाने महाराष्ट्रात भ्रष्टाचार झाल्याबाबतचा प्रश्न एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला होता. त्यावर, आमच्या सरकारच्या काळात कुठं भ्रष्टाचाराचं उदहारण आलंय, असा प्रतिप्रश्न शिंदेंनी केला. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडून माईक घेत या प्रश्नावर उत्तर दिलं.
केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या कायद्याची कन्सेंंट पद्धती बदलली आहे. ती पद्धती बदलल्यामुळे आता काही प्रकरणं त्या कन्सेंटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे, ती संबधित विभागं त्या नव्या नियमानुसार कन्सेंट देत नाहीत, एवढाच तो विषय आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. तसेच, महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी पथक सातत्याने कारवाई करतं, ते कारवाई करतं म्हणूनच लोकं पकडले जातात. त्यामुळे, कारवाईच जर केली नाही, तर... . याउलट आम्ही गृहसचिवांना निर्देशही दिले आहेत की, नियमांत बसत असेल तर ३ महिन्यात भ्रष्टाचाराची प्रकरणे निकाली काढा, असेही फडणवीसांनी सांगितले.