अक्षय तृतियेला सोन्याला झळाळी
By कमलेश वानखेडे | Published: May 10, 2024 06:26 PM2024-05-10T18:26:47+5:302024-05-10T18:27:11+5:30
७५ हजारांचा टप्पा ओलांडला : तोळ्यामागे दीड हजार रुपयांची वाढ
नागपूर : अक्षय तृतियेचा मुहुर्त साधत नागपूरकरांनी सोन्या, चांदीची जोरात खरेदी केली. शहरातील सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून आली. याचा परिणाम दरावरही दिसून आला. सोन्याच्या दराने ७५ हजार रुपयांचा (जीएसटीसह) टप्पा ओलांडला.
नागपुरात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० तोळा भाव ७३ हजारांपर्यंत गेला. जीएसटीसह ही रक्कम ७५ हजार १०० रुपयांपर्यंत पोहचली. गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३५० रुपये (जीएसटीशिवाय) होता. अक्षय तृतियेला त्यात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ झाली. ६ व ७ मे रोजी सोन्याचा दर ७०,२६० पर्यंत खाली आला होता. मात्र, मागील तीन दिवसांपासून सोने चढतीवर राहिले.
चांदीचा दर देखील वाढला. गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो ८२,७५० रुपये (जीएसटीशिवाय) होता. अक्षय्य तृतीयेला हा दर ८५ हजार ५०० रुपयांपर्यंत (जीएसटीशिवाय) गेला. नागपूरकर ग्राहकांनी अक्षय तृतियेचा मुहुर्त साधत मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली. यामुळे सराफा बाजार फुलला, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक सुधीर बैतुले यांनी व्यक्त केली.