जी-२० च्या निमित्ताने शहर सजले, रस्तेही चकाचक; ट्रॅफिक मात्र 'जैसे थे'च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 10:45 PM2023-03-20T22:45:32+5:302023-03-20T22:46:22+5:30
Nagpur News जी-२० (सी-२०) च्या निमित्ताने शहर सजले आहे. शहरातील सुशोभीकरण बाहेरगावच्या पाहुण्यांना भुरळ घालणारे असले तरी वाहतूक पोलिसांकडून योग्य तसे नियोजन झाले नसल्याने विविध भागांत वारंवार वाहतूककोंडी होत आहे.
नागपूर : जी-२० (सी-२०) च्या निमित्ताने शहर सजले आहे. शहरातील सुशोभीकरण बाहेरगावच्या पाहुण्यांना भुरळ घालणारे असले तरी वाहतूक पोलिसांकडून योग्य तसे नियोजन झाले नसल्याने विविध भागांत वारंवार वाहतूककोंडी होत आहे.
सी-२० परिषदेचा उद्घाटन सोहळा आज २० मार्चला पार पडला. या परिषदेच्या निमित्ताने देश-विदेशातील पाहुण्यांचे नागपुरात आगमन होणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शहरात युद्धपातळीवर साैंदर्यीकरणाची कामे करण्यात आली. गेल्या आठ दिवसांत शेकडो मजुरांनी रात्रीचा दिवस करून विविध रस्त्यांची आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भागाची कायापालट केली. यामुळे रस्ते गुळगुळीत अन् चकाचक झाले. पुलांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरही आकर्षक रोषणाई लावण्यात आली. फुटपाथ विस्तारले गेले असून त्यावर हिरवळ उगली आहे. विविध प्रकारची पाना-फुलांची झाडेही डाेलू लागली आहे. चाैकाचाैकांत पाण्याचे कारंजे (फवारे) उडत आहे. हे सर्व पाहून नागपूरकर कमालीचे सुखावल्यासारखे झाले आहे.
बाहेरगावाहून येणारी मंडळीही नागपूरच्या प्रेमात पडत आहे. शहर असावे असे, असेच सध्याचे चित्र असले तरी गेल्या आठ दिवसांत वाहनांची वारंवार होणारी कोंडी नागपूरकर आणि नागपूर बाहेरच्याही मंडळींना प्रचंड मनस्ताप देत आहे. सदर, एलआयसी चाैक, कस्तुरचंद पार्क, रेल्वेस्थानक रोड, सेंट्रल एव्हेन्यू, सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सेंट्रल बाजार रोड, वर्धा रोडवर ठिकठिकाणी वारंवार जाम लागत आहेत. गेल्या आठ दिवसांपासूनची ही स्थिती आहे. वाहतूक शाखेकडून योग्य नियोजन नसल्याने वाहतूककोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. रुग्णवाहिकाही अनेकदा अडकून पडत आहेत. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-----