होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी
By नरेश डोंगरे | Published: March 21, 2024 11:29 PM2024-03-21T23:29:25+5:302024-03-21T23:29:35+5:30
रंगोत्सवात वाढते प्रचंड मागणी : तस्करांकडून रेल्वे आणि खासगी गाड्यांचा वापर
नागपूर : होळी आणि धुळवडीत वाढणारी विविध अंमली पदार्थांची मागणी लक्षात घेता नागपुरात मोठ्या प्रमाणात भांग, गांजा आणि दारूची आवक वाढली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीशी आणि या गोरखधंद्याशी जुळलेले अनेक समाजकंटक तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करून वेगवेगळ्या वाहनांचा वापर करून नागपुरात वेगवेगळ्या अंमली पदार्थांची खेप आणत आहेत.
होळीच्या आणि खासकरून रंगोत्सवाच्या दिवशी अनेक जण झिंगणे पसंत करतात. वर्षभर अंमली पदार्थाकडे न बघणारेही अनेक जण रंगोत्सवाच्या दिवशी 'थोडी थोडी घेऊन' रंगात चिंब भिजतात. मोहल्ल्या मोहल्ल्यात, अनेक सोसायट्यांमध्ये रंगोत्सवाच्या दिवशी खास छोट्या-छोट्या पार्ट्यांचे आयोजन असते. कुणी मद्य, कुणी गांजा तर कुणी भांग घेऊन रंगोत्सवाचा आनंद लुटतात. ऐनवेळी 'रंगाचा भंग नको' म्हणून अनेक जण दोन दिवसांपूर्वीच स्टॉक करून ठेवतात. ते लक्षात घेऊन अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारेही होळीच्या एक आठवड्यापूर्वीपासून खास आक्रमक होतात. नागपुरात मध्य प्रदेशातील प्रतिबंधित अन् बनावट दारू मोठ्या प्रमाणात आणली जाते. त्यासाठी मद्यतस्कर रेल्वेगाड्यांचा आणि परप्रांतातून येणाऱ्या ट्रॅ्हल्सचा वापर करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या मद्यतस्करांनी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांची नजर चुकविण्यासाठी वेगळीच शक्कल लढविली आहे. ते आता फळांच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या दडवून आणत असल्याची माहिती आहे.
गांजा तस्करांची शक्कल
गांजा तस्करांचे नागपूर - विदर्भात मोठे नेटवर्क आहे. ही मंडळी ओडिशा, संभलपूरमधून नियमित रेल्वेगाड्यांमधून गांजाची खेप बोलवून घेते. त्यासाठी त्यांनी महिला-मुलींचा कुरियर म्हणून वापर चालविला आहे. त्यांच्या पर्समध्ये गांजाचे पाकिट लपवून ते नागपुरात आणतात. ही खेप पोहचविणारी मंडळी नागपूरच्या बाहेर रेल्वे गाड्यांचा वेग कमी होताच रुळाच्यापलिकडे झुडपी भागात फेकून देतात. खेप घेणारांना आधीच फोन करून सांगितले जाते. त्यामुळे झुडूपात फेकलेले गांजाचे पार्सल घेऊन तस्कर ते पद्धतशिर वेगवेगळ्या भागात पोहचवितात.
भांगेची खेपही जोरात
सूत्रांच्या मते यावेळी नागपुरात भांगही मोठ्या प्रमाणात आणली जात आहे. ओडिशा, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि गुजरात मध्ये भांग पिकवली जाते. त्यातील ओडिशा आणि आंध्रातील भांग नागपुरात पोहचते. एमडी, गांजा, दारू अशी नशेची तीव्र 'किक' देणाऱ्या अंमली पदार्थांपासून दूर राहणारी मंडळी रंगोत्सवाच्या दिवशी थंडाई म्हणून भांग पिण्यास कचरत नाही. त्यामुळे यावेळी नागपुरात भांगेचीही मोठी खेप आणली जात असल्याची माहिती आहे.
आम्ही दक्ष, त्यांच्यावर आमचे लक्ष !
रेल्वेतून अंमली पदार्थांची लपून छपून नियमित तस्करी केली जाते, हा प्रकार नवीन नाही. मात्र, तस्करी रोखण्यासाठी आणि तस्करांना हुडकून काढण्यासाठी आम्ही आणि आमचे सहकारी दक्ष आहोत. त्यासाठी आमची संशयीतांवर नजर आहे. वेगवेगळ्या गाड्यांची तपासणी आणि संशयितांची झाडाझडती आम्ही घेत आहोत, अशी प्रतिक्रिया या संबंधाने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.