उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रा. स्व. संघाचे राष्ट्रीय मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 08:10 PM2022-02-17T20:10:57+5:302022-02-17T20:16:32+5:30
Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा गुजरातमध्ये ११ ते १३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा गुजरातमध्ये ११ ते १३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अहमदाबादजवळच्या पिराणा येथील सतपथ प्रेरणापीठ संकुलात ही सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असून, त्यादृष्टीने देशपातळीवर राबवायच्या उपक्रमांची यात चर्चा होणार आहे. सोबतच देशपातळीवर महत्त्वाच्या मुद्द्यांवरदेखील मंथन अपेक्षित आहे.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. तसेच पुढील उपक्रमांची रूपरेषादेखील निश्चित करण्यात येते. या सभेदरम्यान सामाजिक समरसतेसह देशभरात गाजत असलेले मुद्दे, शिक्षण, कृषी, अर्थक्षेत्रावर चर्चा होऊ शकते. सोबतच समान नागरी कायद्याबाबत ठराव मांडण्यात येतो का, याकडे सामाजिक वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात संघटन मजबुतीसह सेवाकार्यांचादेखील समावेश राहणार आहे. त्यावरदेखील मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
११ ते १३ मार्चदरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत.
सरसंघचालक, सरकार्यवाह राहणार उपस्थित
तीन दिवसीय चालणाऱ्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. यात भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.