पहिल्याच दिवशी १८ जाेडप्यांनी बांधली रेशीमगाठ, बॅण्ड-बाजाविना लग्नाला पसंती
By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2024 18:59 IST2024-01-01T18:59:28+5:302024-01-01T18:59:49+5:30
मावळत्या वर्षात ३६५० जाेडप्यांचे काेर्टातून शुभमंगल

पहिल्याच दिवशी १८ जाेडप्यांनी बांधली रेशीमगाठ, बॅण्ड-बाजाविना लग्नाला पसंती
नागपूर: नववर्ष किंवा व्हॅलेन्टाईन असाे की वाढदिवस, असे विशेष दिवस अविस्मरणीय करण्यासाठी काहींचा प्रयत्न असताे. प्रेमीयुगालांचा तर हमखास प्रयत्न असताे. प्रेमाचा धागा जुळला की मग एकत्र येऊन ताे अधिक घट्ट करण्याचे वेध लागते आणि मग विशेष दिवसाला काही खास करण्याचा प्रयत्न सुरू हाेताे. प्रेमधागा जुळलेल्या १८ जाेडप्यांनी थेट नववर्षाचा मुहूर्त साधत रेशीमगाठ बांधली आणि हा उत्साहाचा दिवस कायमचा संस्मरणीय केला.
जिल्ह्याच्या विवाह नाेंदणी कार्यालयातून ही खास बातमी मिळाली. १८ जाेडप्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुभमंगल उरकून नव्या संसाराला सुरुवात केली. तसे काेर्टातून लग्न करण्यात एकतर प्रेमीयुगलांचा समावेश असताे किंवा ज्यांना बॅण्डबाजाऐवजी साधेपणा भावताे, त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. मात्र दरवर्षीच्या आकड्यावरून बॅण्ड-बाजा-बारात पेक्षा काेर्टातून साधेपणाने लग्न करण्याकडे लाेकांचा कल वाढ असल्याचे दिसून येते. एकतर लग्नासाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि ताेपर्यंत हाेणारा मनस्ताप, यामुळे नाेंदणी पद्धतीने शुभमंगल करण्याला प्राधान्य दिले जाते. तसेही परगावी नाेकरी व मुहूर्ताची कटकट न ठेवता झटपट लग्नासाठी काेर्टाला पसंती दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाेंदणी कार्यालयात दर महिन्याला २८० ते ३०० च्या आसपास विवाह हाेतात. मावळत्या वर्षात म्हणजे २०२३ मध्ये ३६५० जाेडप्यांनी नाेंदणी पद्धतीने विवाह उरकून घेतले. त्यापूर्वी २०२२ मध्ये हा आकडा ३७०० वर हाेता. यापूर्वी २७०० ते २८०० जाेडप्यांचे नाेंदणी पद्धतीने शुभमंगल व्हायचे. त्यामुळे काेर्टातून लग्न करण्याकडे लाेकांचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.
काेराेनानंतर वाढला कल
काेराेना काळात बहुतेकांचे जुळलेले लग्न थांबवावे लागले. त्यानंतरही दाेन वर्ष थाटामाटात गर्दी जमवत लग्न करणे शक्य झाले नाही. त्यामुळे न्यायालयात साेप्या पद्धतीने विवाह उरकले गेले. परदेशी किंवा परराज्यात किंवा इतर शहरात वास्तव्यास असलेल्यांसाठी हा मार्ग अतिशय व्यवहार्य ठरणारा हाेता. त्यामुळे न्यायालयीन विवाहाकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
न्यायालयीन विवाह जोडप्यांना त्यांचा धर्म, जात किंवा राष्ट्रीयत्व विचारात न घेता त्यांचे एकत्रीकरण करण्याची आणि नोंदणी करण्याची परवानगी देतात. हे कोणत्याही सामाजिक बंधनांशिवाय व्यक्तींना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. आता विवाह नाेंदणी अनिवार्य असल्याने हा कायदेशीर मार्ग सर्वात चांगला आहे, ज्याला सर्वत्र मान्यता आहे. दुसरे म्हणजे न्यायालयीन विवाह हा पारंपारिक व महागडे समारंभ न करणे पसंत करणाऱ्या जोडप्यांसाठी एक सोपा, कायदेशीर व लोकप्रिय पर्याय आहे. हे चांगले संकेत आहेत.- अॅड. स्मिता सिंगलकर, सामाजिक कार्यकर्त्या.