पुन्हा एकदा कट्यार... उलगडलेला सुरेल प्रवास

By Admin | Published: February 1, 2016 02:48 AM2016-02-01T02:48:53+5:302016-02-01T02:48:53+5:30

कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाने एक इतिहास घडविला. त्याचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर आणि गायक वसंतराव देशपांडे हे नागपूरचेच.

Once again ... excursion surrender | पुन्हा एकदा कट्यार... उलगडलेला सुरेल प्रवास

पुन्हा एकदा कट्यार... उलगडलेला सुरेल प्रवास

googlenewsNext

‘द मेकिंग आॅफ कट्यार’ : कलावंत, गायकांचा रसिकांशी मनमोकळा संवाद
नागपूर : कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाने एक इतिहास घडविला. त्याचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर आणि गायक वसंतराव देशपांडे हे नागपूरचेच. त्यामुळे या कलाकृतीवर नागपूरकर हक्क गाजवितात आणि प्रेम करतात. नागपूरकरांचा या कलाकृतीवर जीव आहे आणि त्यांना अभिमानही आहे. अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावेने या नाटकावर आधारित चित्रपट तयार केला आणि या चित्रपटालाही प्रचंड यश लाभले. मास्तर आणि वसंतरावांच्या अनेक आठवणी नागपूरकरांच्या मनात आहेत. या कलाकृतीची नाळ येथील मातीशी जुळली असल्याने कट्यार या चित्रपटाविषयी समजून घेण्याची रसिकांची इच्छा होतीच. मैत्री परिवार आणि विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने कट्यारच्या चमूशी मनमोकळा संवाद, त्यांचा सत्कार आणि एक मैफिल विष्णू की रसोई, बजाजनगर येथे आयोजित करण्यात आली. यात ‘कट्यार...’ चा प्रवास आणि निर्मितीचे क्षण साऱ्याच कलावंतांनी उलगडले.
या कार्यक्रमात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे निर्माते सुनील फडतरे, दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेता सचिन पिळगावकर, अमृता खानविलकर, गायक राहुल देशपांडे, महेश काळे, अस्मिता चिंचाळकर, रंजन दारव्हेकर यांनी हा चित्रपट कसा तयार झाला, चित्रीकरणच्या वेळी कसे अनुभव आले आणि संगीत देताना कसे बदल केले, याच्या आठवणींचा पट उलगडला. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी नागपूरकरांच्यावतीने या सर्वच कलावंतांचा एक कट्यार देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी शिवमुद्रा ढोलताशा पथकाचे वादन अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचा भास निर्माण करणारे होते. भव्य सजविलेला रंगमंच कट्यार काळजात घुसली या नाटकाची वातावरणनिर्मिती साधणारे होते. भगवे फेटे, भव्य रंगमंच, नाट्यपदांची रंगत आणि उपस्थितांची दाद यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. सूरसंगमच्या कलावंतांनी ‘मोरया मोरया...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला. त्यानंतर विष्णू मनोहर यांनी कविराजाच्या भूमिकेत रंगमंचावर एन्ट्री घेत काव्यात्मकतेत कार्यक्रमाची संकल्पना मांडली. नागपुरातील गायक गुणवंत घटवई यांनी यावेळी ‘या भवनातील गीत पुराणे...’ हे गीत सादर करून वसंतरावांची आठवण ताजी केली. कार्यक्रमात विष्णू मनोहर यांची आई कालिंदी मनोहर यांनी ८१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कालिंदी यांनी मैत्री परिवार संस्थेला याप्रसंगी ८१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला.
या कार्यक्रमात सूरसंगमच्या कलावंतांनी गीत आणि वाद्यसंगत केली. यात मुकुल पांडे, गुणवंत घटवई, सुरभी ढोमणे, सचिन ढोमणे, अमर कुळकर्णी, नरेंद्र कडवे, श्रीधर फडणवीस, विक्रम जोशी, अभिनव अनसिंगकर यांचा सहभाग होता. ध्वनी संदीप बारस्कर तर प्रकाशव्यवस्था मायकल लाईट्स यांची होती.
याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, ही कलाकृती निर्माण करणारे दारव्हेकर मास्तर, डॉ. वसंतराव देशपांडे नागपूरचे. त्यामुळे नागपूरकरांशी या कलाकृतीचा जवळचा संबंध आहे. चित्रपटाच्या निमित्ताने आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन महान कलावंतांनाही आपण आदरांजली देतो आहोत. एखादी कलाकृती दर्जेदार असली तर रसिक त्यावर प्रेम करतात, याचे उदाहरण म्हणजे कट्यार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला या चित्रपटाच्या निमित्ताने चांगले दिवस आले. हे संचित असेच समोर जात राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. गिरीश गांधी यांनीही याप्रसंगी कट्यारच्या नाट्यप्रयोगाच्या काही आठवणी सांगून रसिकांना नॉस्टॉल्जिक केले. मैत्री परिवाराच्या एकूणच कार्याचा आढावा घेत नागरिकांना सामाजिक कार्यासाठी मदतीचे आवाहन संजय भेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उत्तरा पटवर्धन, विष्णू मनोहर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद पेंडके, राधा सहस्रभोजनी, विघ्नेश जोशी, प्रफुल्ल मनोहर, मिलिंद देशकर, विजय जथे, विजय शहाकार, अनिल शर्मा, मंजुषा पांढरीपांडे, मनिषा गर्गे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप पसायदान गाऊन नंदिनी भोजराज यांनी केला.
महेश काळे म्हणाला, सुबोध आणि राहुलमुळे पुन्हा एकदा मला शास्त्रीय संगीत सादर करता आले. शंकरजींकडूनही बऱ्याच बाबी कळल्या. चित्रपटाला यश मिळते आहे, याचे समाधान आहे. अमृता खानविलकर म्हणाली, नटरंगनंतर मला स्वत:ला अभिनयात सिद्ध करण्याची संधी सुबोधमुळे मिळाली. माझ्याकडून जे चांगले झाले त्याचे श्रेय मी सुबोधलाच देते. (प्रतिनिधी)

Web Title: Once again ... excursion surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.