पुन्हा एक रेवडेसिविर चोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:07+5:302021-04-23T04:09:07+5:30
इंजेक्शन चोरले अन् त्याच हॉस्पिटलमधील रुग्णाला विकले - धंतोलीत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - हॉस्पिटलमधील रेमडेसिविर इंजेक्शन ...
इंजेक्शन चोरले अन् त्याच हॉस्पिटलमधील रुग्णाला विकले - धंतोलीत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - हॉस्पिटलमधील रेमडेसिविर इंजेक्शन चोरून ते त्याच हॉस्पिटलमधील रुग्णाच्या नातेवाईकाला ब्लॅकमध्ये विकण्याचा पुन्हा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी धंतोलीतील सफल हॉस्पिटलमधील एका वाॅर्डबॉयला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अतुल हिरडकर (वय २७) असे या भामट्याचे नाव असून, तो उमरेडमधील रहिवासी आहे.
आरोपी अतुल काही दिवसापूर्वीच धंतोलीतील सफल हॉस्पिटलमध्ये वाॅर्डबॉय म्हणून कामाला लागला. येथील कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांना लावण्यासाठी संबंधित प्रशासनाने हॉस्पिटलच्या फ्रीजमध्ये इंजेक्शन आणून ठेवले होते. त्यातील एक इंजेक्शन बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास चोरीला गेल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी कोविड वाॅर्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. सर्वांनीच कानावर हात ठेवले. मात्र, आरोपी अतुलचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तो कबुली देत नसल्याचे पाहून डॉ. सुनील सूद यांनी धंतोली पोलिसांना कळविले. पोलिसांकडे तक्रार गेल्याचे लक्षात आल्याने आरोपी फरार झाला. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली. चाैकशीत त्याने साडेतीन हजार रुपये किमतीचे हे इंजेक्शन याच हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला २० हजारात विकल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. आरोपी अतुलसोबत रुग्णालयातील एका महिलेचे सख्य आहे, ती या चोरीत सहभागी आहे का, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.
---
टोळी पोहचली कारागृहात
रेमडेसिविरची चोरी तसेच ब्लॅक मार्केटिंग करण्याच्या प्रकरणात आतापावेतो शहरातील कामठी, जरीपटका, सक्करदरा, इमामवाडा, सीताबर्डी आणि धंतोली पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल केले आहेत. त्यात एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली. सर्वाधिक रेमडेसिविरची विक्री कामठी आणि जरीपटक्यातील टोळींनी केली आहे. जरीपटक्यातील टोळीकडून पोलिसांनी आतापावेतो एक लाख रुपयाची रक्कमही जप्त केली. ही टोळी आता न्यायालयीन कस्टडीत पोहचली आहे.
---
----