कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात माथनकर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:42 PM2018-08-31T22:42:10+5:302018-08-31T22:47:28+5:30

कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात गुंड युवराज माथनकर याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांची आक्रमकता पाहून माथनकरची रॅली काढण्याच्या तयारीत असलेले त्याचे साथीदार पळून गेले.

Once notorious Mathankar release from the jail police arrested | कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात माथनकर पोलिसांच्या ताब्यात

कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात माथनकर पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई : साथीदारांनाही हुसकावून लावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारागृहातून बाहेर पडताच कुख्यात गुंड युवराज माथनकर याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांची आक्रमकता पाहून माथनकरची रॅली काढण्याच्या तयारीत असलेले त्याचे साथीदार पळून गेले.
जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याच्या आरोपात माथनकरला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो कारागृहात बंद होता. न्यायालयाने माथनकर आणि साथीदारांना गुरुवारी दोषमुक्त केले. त्यामुळे शुक्रवारी त्याला कारागृहातून सोडले जाणार होते. त्याची कल्पना असल्यामुळे माथनकरचे साथीदार मोठ्या संख्येत कारागृहात पोहचले. त्याला वाहनाच्या काफिल्यात (रॅली काढून) सोबत नेण्याचे साथीदारांचे मनसुबे होते. मात्र, माथनकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने पोलीस उपायुक्त भरणे यांनी त्याला आधीच कारवाईचा कडक इशारा देण्याची व्यवस्था केली होती. त्यानुसार, बेलतरोडीचे पोलीस पथक कारागृहाच्या समोर पोहचले. तेथे धंतोलीचा पोलीस ताफाही होता. दुपारी १ वाजता माथनकर कारागृहाच्या दारातून बाहेर आला. त्याचवेळी त्याला बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी, धंतोली पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा देत माथनकरच्या साथीदारांना कारागृहाच्या परिसरातून हुसकावून लावले. माथनकरला थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला पुन्हा कोणताही गुन्हा न करण्याची ताकीद देऊन व्यक्तिगत जातमुचलक्यावर सोडण्यात आले.

पोस्टर गँगमुळे चर्चेत
दोन वर्षांपूर्वी युवराज माथनकरच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागात मोठमोठे होर्डिंग्स लागले होते. या होर्डिंग्समुळेच पोस्टर गँग म्हणून शहरातील काही गुन्हेगार चर्चेत आले होते. त्यात माथनकरचाही समावेश होता. पोस्टर गँगमधील बहुतांश गुंडांवर मोक्का, तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

कुख्यात पप्पू डागोरला अटक


आॅपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत पाचपावली पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास कुख्यात विकास ऊर्फ पप्पू राजू डागोर (वय २५,रा. रामनगर तेलंखेडी) याला मोतीबाग रेल्वेक्रॉसिंगजवळ अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले.
कुख्यात पप्पू डागोरविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ पाचपावली पोलीस पथकाला संशयास्पद अवस्थेत आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तुल आढळले. त्यातील मॅगझिनमध्ये काडतूस मात्र नव्हते. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, हवलदार रामेश्वर कोहळे, नायक राज चौधरी, अभय साखरे, विजय लांडे आणि सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Once notorious Mathankar release from the jail police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.