एक एकर उसाचा काेळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:07+5:302021-05-05T04:14:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि खाली पडलेल्या ठिणगीमुळे कचऱ्याने पेट घेतला. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि खाली पडलेल्या ठिणगीमुळे कचऱ्याने पेट घेतला. या आगीत एका एकरातील कापणीयाेग्य उसाचा काेळसा झाला असून, किमान एक लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजापूर शिवारात मंगळवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
भागवत ढोपरे, रा. सहजापूर, ता. नरखेड यांनी त्यांच्या शेतात उसाची लागवड केली असून, ऊस पक्व झाल्याने त्यांनी नुकतीच कापणीला सुरुवात केली हाेती. त्यातच शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा हवेमुळे एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली. या ठिणगीमुळे शेतातील कचऱ्यासाेबतच उसाचा पाचाेळा आणि उसाने पेट घेतला. रखरखत्या वातावरणामुळे ही आग संपूर्ण शेतात पसरली आणि एका एकरातील उसाचे पीक जळून राख झाले. यात ५० टन ऊस जळाल्याने किमान एक लाख रुपयाचे नुकसान झाले, अशी माहिती भागवत ढाेपरे यांनी दिली.
माहिती मिळताच महावितरण कंपनीचे शाखा अभियंता हर्षल बाेंद्रे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, कृषी सहायक वैशाली खंडारे, सतीश रेवतकर, पोलीस कर्मचारी अरविंद जाधव, जोशी, तलाठी जंगले यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.