सव्वाशे वर्षापूर्वी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, एकाचाही मृत्यू झाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:16+5:302021-02-09T04:11:16+5:30
अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा ...
अशीच एक घटना सव्वाशे वर्षापूर्वी घडली होती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीची एक उपनदी आहे. तिचे नाव विरही गंगा आहे. १८९३ मध्ये एक डोंगर खचल्यामुळे नदीचा प्रवाह बंद झाला. त्यावेळी पावसाचे दिवस होते. जवळच्या गावकऱ्यांनी इंग्रजांना याची माहिती दिल्यानंतर ते ताबडतोब सक्रिय झाले. सुमारे पावणे दोनशे किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वारच्या रायवाला येथील अधीक्षक अभियंता ले. कर्नल पुलफोर्ड यांनी तत्काळ आपल्या अभियंत्यांना घटनास्थळावर पाठवले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो बांध भरण्यासाठी एक वर्ष लागेल असा अंदाज लावण्यात आला. तसेच, बांध फुटल्यास मोठे नुकसान होईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. त्या बांधाला गौना ताल नाव देण्यात आले. कर्नल पुलफोर्ड यांनी त्यांच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बांधावरच तैनात ठेवले. तेथून रायवालापर्यंत टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. तो टेलिग्राफ म्हणजे तार, जो गेल्यावर्षी संपुष्टात आला. ती टेलिग्राफ लाईन डोंगरांवरील जंगलात झाडांवर ठोकून लावण्यात आली. बांधावर सतत लक्ष ठेवले जात होते. दरम्यान, बांध तीन किलोमीटर लांब झाला. इंग्रजांनी जवळच गेस्ट हाऊस बांधले. तेथून बांध स्पष्ट दिसत होता. बांधाच्या पाण्यात बोटिंग व मासेमारी सुरू झाली. तो बांध भूवैज्ञानिकांसाठी कुतूहलाचा विषय झाला. त्यावेळचे सर्वात मोठे भूवैज्ञानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले. दरम्यान, तो बांध १५ ऑगस्ट १८९४ रोजी फुटण्याचा अंदाज लावण्यात आला. इंग्रजांनी नागरिकांना हटवण्यास सुुरुवात केली. त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. अलकनंदा नदीवरील काही पूल हटवण्यात आले. त्यानंतर २७ ऑगस्ट १८९४ रोजी तो बांध फुटला व चमोली, रुद्रप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश, हरिद्वार या भागात मोठे नुकसान झाले. या घटनेला कुणीच थांबवू शकत नव्हते, पण विशेष म्हणजे या घटनेत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
८५ वर्षानंतर १९७० मध्ये तो बांध दुसऱ्यांदा फुटल्यानंतर जनधनाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावरून इंग्रजांनी केलेले आपत्ती व्यवस्थापन किती उत्तम होते हे दिसून येते. देशविदेशातील तज्ज्ञ आजही त्या व्यवस्थापनाला सन्मानासह स्मरण करतात. परंतु, आपल्या सरकारकरिता ही घटना केवळ फाईलमधील एक उल्लेख आहे. त्यातून काही शिकण्याची कुणाचीच इच्छा नाही.
**************
पर्यावरणतज्ज्ञ व ज्येष्ठ पत्रकार सुशील बहुगुणा यांनी डोंगराळ भागातील आपत्तीवर २०१५ मध्ये लेख लिहिला होता. तो लेख सोशल मीडियावर उपलब्ध आहे. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात ग्लेशियर तुटल्यामुळे आलेली आपत्ती लक्षात घेता तो लेख प्रकाशित केला जात आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास सर्वात मोठी आपत्तीही कशी टाळली जाऊ शकते यावर हा लेख प्रकाश टाकतो.