पाच दिवसांत दीड लाख लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:05+5:302021-06-26T04:08:05+5:30
नागपूर : कोरोनाच्या गंभीर परिणामांना दूर ठेवण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र, दरम्यानच्या काळात मंदावलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात बुधवारपासून ...
नागपूर : कोरोनाच्या गंभीर परिणामांना दूर ठेवण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र, दरम्यानच्या काळात मंदावलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात बुधवारपासून १८ वर्षांवरील तरुणांचाही समावेश करण्यात आल्याने लसीकरणाला पुन्हा गती आली आहे. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसात १ लाख ५६ हजार ४१८ लोकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आले. यात १८ ते ४४ वयोगटातील ९८ हजार ३७७ तरुणांनी पहिला डोस घेतला. आतापर्यंत १४ लाख ४८ हजार १२१ लोकांना डोस देण्यात आले. यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र ३ लाख १८ हजार ८१० आहे. ही वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
कोरोनाचा पहिल्या लाटेचा कहर ओसरताच १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला एकट्या नागपूर जिल्ह्यात रोज साधारण १५ ते २० हजार दरम्यान लसीकरण होत होते. परंतु मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होताच खासगी हॉस्पिटलमधील केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही थांबविण्यात आले. यामुळे या मोहिमेलाच ब्रेक लागला. नागपूर जिल्ह्यात रोज पाच हजारही लसीकरण होत नव्हते. परंतु २३ जूनपासून १८ वर्षांवरील वयोगटासाठी पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात होताच सर्वच केंद्रांवर गर्दी उसळत आहे. या दिवशी ४० हजार २३९ नागरिकांचे विक्रमी लसीकरण झाले. मात्र शुक्रवारी लसीचा तुटवडा पडल्याने मोजकेच केंद्र सुरू ठेवल्याने पुन्हा घट झाली.
-आज मनपाच्या ११६ केंद्रावर कोव्हिशिल्ड
राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे शनिवारी १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या ११९ केंद्रावर होणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या ११६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोस तर १८ वर्षांवरील तरुणांसाठी दुसरा डोस मेडिकल, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे.
पाच दिवसांत झालेले लसीकरण
२० जून : १४,६६६
२१ जून : २०,१३०
२२ जून : २५,३११
२३ जून : ४०,२३९
२४ जून : ३५, ४६९
२५ जून : २०,६०३