राज्यात विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:27 AM2019-06-29T10:27:34+5:302019-06-29T10:30:26+5:30

गेल्या तीन महिन्यात साधारण चार लाख वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी यातील सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच नसल्याचे सामोर आले आहे.

One and half lakh vehicles in the city, running without number plate | राज्यात विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर

राज्यात विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर

Next
ठळक मुद्देहाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा उडाला गोंधळ दोन लाखांवर आरसीही प्रलंबित

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरक्षेसाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात साधारण चार लाख वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी यातील सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच नसल्याचे सामोर आले आहे. काही वाहने विना नंबरप्लेट रस्त्यावरून धावत आहे. तर, काहींनी कारवाईच्या भीतीने जुन्या नंबर प्लेटचा वापर सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे, सेवापुरवठादाराकडून बारकोड मिळाल्यानंतर व डीलरकडून वाहन प्रणालीमध्ये त्याची नोंद केल्यानंतरच आरसी तयार होते.
परंतु याकडे डीलर व आरटीओ दोघांचेही दुर्लक्ष झाल्याने लाखो आरसी प्रलंबित पडल्या आहेत.
राज्यात महिन्याकाठी साधारण दीड ते दोन लाख नव्या वाहनांची खरेदी होते. आरटीओकडून या वाहनांचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानुसार एप्रिल ते जून महिन्यात सुमारे चार लाखांवर वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असावे, असा अंदाज आहे. रजिस्ट्रेशनंतर नंबर प्लेटचा नंबर आरटीओ डीलरला उपलब्ध करून देतो. सूत्रानुसार, हे नंबर मिळण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. मिळालेल्या या नंबरची यादी डीलरकडून संबंधित कंपनीला पाठविण्यासही पुन्हा एक-दोन दिवसांचा कालावधी जातो. कंपनी ‘एचएसआरपी’ तयार करणाऱ्या सेवापुरवठादाराला ही यादी देते. परंतु सेवापुरवठादाराकडून ‘एचएसआरपी’वर नंबर टाकण्यापासून ते तयार करायला व डीलरकडे यायला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.
नंबरप्लेट लावण्यासाठी डीलर वाहनचालकाला बोलावून घेत असला तरी वाहनचालक त्याच्या सवडीनुसार येतो. परिणामी, लाखो वाहने विना नंबरप्लेट रस्त्यावर धावत आहेत.
ना ‘चिप’, ना ‘सेन्सॉर’
वाहने चोरी, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ महत्त्वाची ठरणार होती. हायटेक टेक्नॉलॉजी वापरून बनविण्यात येणाºया या नंबर प्लेटवर ‘इलेक्ट्रॉनिक चिप’ तसेच ‘सेन्सॉर’ लावण्यात येणार होते. यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती असणार होती. सेन्सॉरमुळे याचा गैरवापर होत असेल तर संबंधित प्रशासनाला याची माहिती लगेच मिळणार होती. चोराने वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर प्राप्त होणार होता. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास लवकर होण्यास मदत होणार होती, अशी माहिती हायसिक्युरिटी नंबरप्लेट येण्यापूर्वी काही आरटीओ अधिकाºयानी दिली होती. परंतु वास्तवात ‘बारकोड’ शिवाय नंबरप्लेटवर ना ‘चीप’ आहे, ना ‘सेन्सॉर’ आहे. यामुळे ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट ‘हाफ’वर आल्याचे बोलले जात आहे

‘बारकोड’च्या नोंदीकडे दुर्लक्ष
वाहनाच्या मागील व समोरील भागातील नंबरप्लेटवर असलेल्या वेगवेगळ्या ‘बारकोड’ची नोंद डीलरने वाहन प्रणालीत केल्यानंतर आरटीओ कार्यालयाने ‘आरसी’ (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) तयार करावी, अशा परिवहन विभागाच्या नव्या सूचना आहेत. परंतु ही नोंद करण्याकडे डीलरचे व प्रणालीत नोंद होत आहे, किंवा नाही हे पाहण्याकडे आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रलंबित आरसीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात दोन लाखांवर आरसी प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे.

नियमाची पायमल्ली, जुन्या नंबर प्लेटचा वापर
एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्व नव्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक आहे. परंतु ही नंबर प्लेट मिळण्यास उशीर होत असल्याने अनेक वाहनचालक कारवाईच्या भीतीने जुन्या नंबर प्लेटवर आरटीओकडून मिळालेला नंबर टाकून रस्त्यावरून धावत आहे. नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना आरटीओसह वाहतूक पोलिसांचे अद्यापही याकडे लक्ष गेलेले नाही.

Web Title: One and half lakh vehicles in the city, running without number plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.