दीड महिन्याचे हिवाळी अधिवेशन?
By admin | Published: October 28, 2014 12:27 AM2014-10-28T00:27:01+5:302014-10-28T00:27:01+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नसतानाही प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच अधिवेशन किती आठवड्याचे असेल, हेही ठरलेले नाही. ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या
भाजपवर नागपूर कराराचे पालन करण्याचा दबाव
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नसतानाही प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच अधिवेशन किती आठवड्याचे असेल, हेही ठरलेले नाही. ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर अधिवेशनाची तारीख निश्चित के ली जाईल, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत सरकारवर नागपूर कराराचे पालन करीत नसल्याचा आरोप करणाऱ्या भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे यावेळी कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन दीड महिन्याचे राहील, अशी वैदर्भीय जनतेला आशा आहे.
नागपूर करारानुसार गतकाळात मध्य प्रदेशची राजधानी राहिलेल्या नागपूर शहराला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. यासोबतच येथे विधिमंडळाचे अधिवेशन सहा आठवड्याचे घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळानंतर कोणत्याही सरकारने याचे पालन केलेले नाही.
मागील काही वर्षांत हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यातच गुंडाळले जाते.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देणारा भाजप आजवर अधिवेशन सहा आठवड्याचे असावे, अशी सातत्त्याने मागणी करीत आहे. पक्षभेद विसरून विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनी या मागणीला नेहमीच पाठिंबा दिला आहे. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. भाजप सत्तेत येणार आहे. त्यामुळे अधिवेशन सहा आठवडे चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.
नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळाचे विशेष सत्र मुंबईत होईल की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शपथविधी होईल, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, विदर्भ राज्य जॉर्इंट अॅक्शन कमिटीचे संयोजक अहमद कादर यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विदर्भातील आमदारांशी संपर्क साधून त्यांना याची जाणीव करून देणार असल्याची माहिती कादर यांनी दिली.(प्रतिनिधी)