नागपूरच्या जरीपटक्यातील फायरिंग प्रकरणात एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:11 PM2020-09-14T21:11:24+5:302020-09-14T21:14:27+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत.
जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील (२७) हा रविवारी रात्री मिसाळ ले-आऊट मधून इकोकारने घराकडे येत होता. वैशाली स्कूलजवळ दहा ते पंधरा तरुण दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते. पाटीलने दुचाकी बाजूला घ्या, म्हटल्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींकडे शस्त्र असल्याचे पाहून पाटील आपल्या घराकडे निघाला. त्याचा पाठलाग करून दहा ते बारा आरोपी हुडको कॉलनीतील पाटीलच्या घरी धडकले. ते आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्यामुळे पलाशचा भाऊ प्रीतेश (२६) समोर आला. त्याने आरोपींना जाब विचारताच एकाने पिस्तुलातून दोन ते तीन फायर केले. त्यातील एक गोळी भिंतीवर आदळून प्रीतेशला लागल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर तलवार, चाकू, कुकरी घेऊन आरोपींनी हैदोस घातला. दुचाकीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. मोठ्या संख्येत आजूबाजूचे नागरिक गोळा झाल्यामुळे आरोपी पळून गेले. दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्यापूर्वीच आरोपी पळून गेले होते. जखमी प्रीतेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पुनेश ठाकरे, मनोज कहाळकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. आज आरोपी कहाळकर पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ यांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्याचा १९ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
जखमीची प्रकृती धोक्याबाहेर
या प्रकरणातील फिर्यादी पलाश राजू पाटील आणि त्याचा भाऊ (जखमी) प्रीतेश भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. सोबतच ते पोलीस दलात भरती होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सराव करीत आहेत. जखमी प्रीतेशची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
सर्वत्र खळबळ
क्षुल्लक कारणावरून फायरिंग झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सोमवारी जरीपटका ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती घेतानाच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंबंधीची निर्देश दिले. पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.