वर्धा, अमरावतीसह सात वैद्यकीय, एक दंत महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:53 AM2023-08-08T10:53:26+5:302023-08-08T10:55:49+5:30
एक हजार जागेवर होणार प्रवेश : आरोग्य विद्यापीठातर्फे संलग्नता प्रदान
नागपूर : राज्यातील वर्धा, अमरावतीसह सात वैद्यकीय व एक दंत महाविद्यालयाने अखेर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत हमीपत्र दिल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, (एमयूएचएस) नाशिकने अखेर संलग्नता प्रदान केली. त्यामुळे एक हजार प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील सात वैद्यकीय महाविद्यालये आणि एका दंत महाविद्यालयात अपुरी शिक्षकसंख्या असलेल्या त्रुटीवर बोट ठेवत विद्यापीठाने संलग्नता काढून घेतली. परिणामी या सर्व खासगी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अडचणीत आल्या होत्या. दरम्यान संबंधित महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी शिक्षक संख्येच्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबतचे हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केले.
- अपुरी शिक्षक संख्येची त्रुटी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, सात वैद्यकीय व एक दंत महाविद्यालयांनी त्रुटी पूर्ततेबद्दल हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सदर महाविद्यालयांना संलग्नता देण्यात आली. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला याबाबत विद्यापीठातर्फे महाविद्यालय व त्यांच्या प्रवेश क्षमतेबद्दल अवगत करून देण्यात आले.
- या महाविद्यालयांना संलग्नता प्रदान : प्रवेश क्षमता
१) तेरना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेरुळ, नवी मुंबई : १५०
२) एसएसपीएम मेडिकल कॉलेज, कुडाळ, सिंधुदुर्ग : १५०
३) डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, रायगड : १००
४) डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती : १५०
५) महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम, वर्धा : १००
६) वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पालघर. : १५०
७) जवाहर मेडिकल फाउंडेशन एसीपीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, धुळे : १००
८) तेरना डेंटल कॉलेज, नवी मुंबई. : १००