एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 07:00 AM2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:12+5:30

एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

One butterfly gives life to 10 plants | एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

googlenewsNext
ठळक मुद्दे परागीकरणातून जैवविविधतेचे संतुलनअल्पायुष्यात शेकडो फुलझाडांचा करतात प्रसार 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्त्वाची भूमिका पार पाडताहेत. परागीकरण ही शास्त्रीय व्याख्या आहे. पक्षी, कीटक आणि फुलपाखरे यांच्याद्वारे ही क्रिया पार पडते. एका फुलांवरून दुसºया फुलांवर भ्रमण करताना हे निसर्गदूत अजाणतेपणे त्या वृक्षाचे बीजांश वाहून इतर ठिकाणी वाहून नेतात आणि त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो. खरेतर जंगलातील लाखो झाडे कुणी वृक्षारोपण केल्याने झाली नाहीत तर याच परागीकरणाच्या क्रियेतून झाली आहेत. यामुळे या इवल्याशा जीवाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

आज जगभरात ज्ञात असलेल्या कीटकांची संख्या १ लाख ५० हजार इतकी असून त्यापैकी १७,८२४ इतकी फुलपाखरे जगात आहेत. अलीकडील आकडेवारीनुसार भारतात १,५०५ इतकी फुलपाखरे आहेत. हीच संख्या महाराष्ट्रात २७७ च्या घरात आहे. विदर्भात १८५ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात.

मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात आपण निरीक्षण केल्यास २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला एकाच भेटीत नक्कीच पाहायला मिळतील. फुलपाखरे ही अन्नसाखळीत महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ पर्यावरणाचे प्रतीक आहे. सातपुडा व सह्याद्री व त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. आपण अनेक दुर्मिळ तशीच इतरही फुलपाखरे तिथे मोठ्या संख्येने पाहू शकतो. तेथे फुलपाखरांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने भारतात पहिल्यांदाच ‘निलवंत’ याला आपले राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे.

फुलपाखरांचा मुख्य आधार हा वनस्पतीच असतात. त्याच वनस्पतीवर ते आपली गुजराण करतात व त्यांच्या उगवणाºया फुलातील मधुरस घेतात. हे त्यांचे मुख्य ऊर्जास्त्रोत आहेत. मात्र फुलातील परागीकरण करताना ते त्या झाडाचे बीजांश दुसरीकडे रोपण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. हे जैवविविधता संतुळनाचे अनोखे उदाहरण आहे आणि यासाठीच कदाचित सुंदर, मोहक रूपाच्या फुलपाखरांची निर्मिती झाली आहे.

सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’
साधारणत: सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, ही अभिमानाची बाब आहे.
- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळ

Web Title: One butterfly gives life to 10 plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.