नागपुरात लॉकडाऊनच्या नैराश्यातून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:16 PM2020-05-07T23:16:47+5:302020-05-07T23:18:31+5:30
रोजगार हिरावला गेल्यामुळे आणि आर्थिक कोंडी झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अखिलेश ब्रिजमोहन माहेश्वरी ( वय ५२) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोजगार हिरावला गेल्यामुळे आणि आर्थिक कोंडी झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अखिलेश ब्रिजमोहन माहेश्वरी ( वय ५२) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
अखिलेश माहेश्वरी महाल भागात सिंधू अपार्टमेंटमध्ये राहत होते. ते एका स्टील कंपनीत कार्यरत होते. लॉकडाऊनमुळे कंपनीला टाळे पडले आणि त्यांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आणि त्यांना नैराश्य आले. बुधवारी रात्री पत्नी आणि दोन मुलासोबत त्यांनी जेवण केले, नंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. आज सकाळी ८ च्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना जाग आली तेव्हा अखिलेश माहेश्वरी हे शयनकक्षातील सिलिंग फॅनला केबलच्या सहाय्याने गळफास लावून दिसले. पत्नीने आणि मुलांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूची मंडळी धावली त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून अखिलेश माहेश्वरी यांच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारी आणि आर्थिक कोंडीमुळे ते काही दिवसांपासून अस्वस्थ राहत होते. त्यांच्या बोलण्यातूनही निराशा जाणवत होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.