वर्दळीच्या मार्गावर हवालाचे सव्वा कोटी रुपये लुटले; लकडगंज हद्दीतील खळबळजनक घटना; आरोपींची शोधाशोध
By नरेश डोंगरे | Published: August 2, 2023 05:44 AM2023-08-02T05:44:25+5:302023-08-02T05:45:18+5:30
रोकड हवालाची असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, लुटण्यात आलेल्या रकमेचा आकडा पुढे आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
नागपूर : अनेकांचे जाणे येणे सुरू असताना दोन भामट्यानी एका दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना पकडले. त्यांना माऊझरचा (पिस्तुल) धाक दाखवला आणि अनेकांदेखत १ कोटी १५ लाखांची रोकड लुटून नेली. मंगळवारी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही रोकड हवालाची असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, लुटण्यात आलेल्या रकमेचा आकडा पुढे आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
नेहरू पुतळा परिसरात बारदाना गल्ली असून याच गल्लीत हवाला व्यापारी वीरम पटेल यांचे कार्यालय आहे. नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री ८.३० वाजता पटेल यांनी कार्यालय बंद केले. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांच्या हाती सुमारे १ कोटी १५ लाखांची रोकड असलेली बॅग दिली. ही बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दोन कर्मचारी भूतडा चेंबरपासून निघाले.
विशेष म्हणजे, मोठी रोकड घेऊन ॲक्टीव्हास्वार येणार अशी आधीच माहिती मिळाल्यामुळे ८ वाजून ३७ मिनिटांनी दोन आरोपी बाजुच्या गल्लीत थांबले. या गल्लीतील दुकाने त्यावेळी सुरू होती आणि येणारा-जाणारांचीही वर्दळ होती. काळा टी शर्ट घातलेले पटेल यांच्याकडील ते दोन युवक ॲक्टीव्हा घेऊन येताना दिसताच शांतपणे एक जण समोर झाला आणि त्याने दुचाकी थांबविली. कसलीही मारहाण अथवा काहीही न करता त्यांनी दोघांनाही बाजुच्या दुकानाच्या शटरजवळ आणले आणि त्यांच्या हाताला झटका मारून पटेल यांचे कर्मचारी पळून जाताच आरोपींनी रोकड असलेली दुचाकी घेऊन पळ काढला. दरम्यान, लुटारूजवळून पळून आलेल्या तरुणांनी लुटमार झाल्याची माहिती पटेल यांना दिली. त्यानंतर लकडगंज पोलिसांना कळविण्यात आले.
सव्वा कोटी लुटून नेल्याचे कळताच पोलीस हादरले. ठाणेदार अतुल सबनिस यांनी लगेच वरिष्ठांना माहिती कळवली. त्यानंतर सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह उपायुक्त गोरख भामरे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अनेक भागात लुटारूंना पकडण्यासाठी नाकेबंदीही करण्यात आली.
माउजरचा धाक दाखविला?
कर्मचाऱ्यांच्या मते आरोपींनी त्यांना माऊजरचा धाक दाखविल्याने ते घाबरले आणि त्यांनी रोकड लुटण्याचा प्रतिकार केला नाही. मात्र, त्यांना खरेच माउजर दाखविण्यात आले का, याबाबत पोलीस साशंक आहेत. पोलीस कथित माऊजरधारक आरोपींचा शोध घेत आहेत.
व्हिडीओत लुटमार कैद
लुटमारीची ही घटना संशयास्पद आहे. ती व्हिडीओत कैद झाली आहे. ज्या पद्धतीने आरोपी दोन मिनिटांपूर्वी तेथे आले अन् अनेक जण जात येत असताना त्यांनी सहजपणे पटेल यांच्या कर्मचाऱ्यांना थांबविले आणि रोकड लुटून नेली. ते बघता लुटमारीत कर्मचारीही सहभागी आहेत की काय, असा संशय येत असल्याचे पोलीस अधिकारी खासगीत सांगतात.