देशात दररोज एक कोटी जनतेचे लसीकरण व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:56+5:302021-06-05T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात दररोज एक कोटी नागरिकांचे लसीकरण व्हावे. तसेच त्यांना लस मोफत मिळावी, अशी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात दररोज एक कोटी नागरिकांचे लसीकरण व्हावे. तसेच त्यांना लस मोफत मिळावी, अशी मागणी शहर कॉंग्रेस व जिल्हा कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कॉंग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे व ग्रामीण कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
कोरोना महामारीच्या संकटावर लस हा प्रभावी उपाय आहे. परंतु, केंद्र सरकार संथगतीने लसीकरण मोहीम राबवित आहे व या वेगाने लसीकरण पूर्ण होण्यास काही वर्षे लागतील. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा देत असताना संथगतीने होत असलेले लसीकरण घातक ठरू शकते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, खासदार राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारला सल्लाही दिलेला आहे. परंतु, केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप कॉंग्रेसकडून लावण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, डॉ. गजराज हटेवार, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, पंकज निघोट, अजय हटेवार, पंकज थोरात, विजय राऊत, निखिल धांदे प्रामुख्याने उपस्थित होते.