नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खदान पतसंस्थेत एक कोटीचा गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:21 PM2018-09-29T21:21:49+5:302018-09-29T21:22:40+5:30
सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोळसा खदान मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्थेत संचालकांनी केलेल्या १ कोटी ४ लाख ८२ हजार ४९० रुपयांच्या घोटाळाप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पतसंस्थेचे सचिव तथा मुख्य आरोपी शरदचंद्र दास, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आठ असून, सर्व जण पतसंस्थेचे संचालक आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोळसा खदान मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्थेत संचालकांनी केलेल्या १ कोटी ४ लाख ८२ हजार ४९० रुपयांच्या घोटाळाप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी पतसंस्थेचे सचिव तथा मुख्य आरोपी शरदचंद्र दास, रा. वानाडोंगरी, ता. हिंगणा यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आठ असून, सर्व जण पतसंस्थेचे संचालक आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या पतसंस्थेची स्थापना ४ एप्रिल २००१ रोजी करण्यात आली असून, २००८ पासून पतसंस्थेने मुदत ठेव, आवर्ती ठेव, शेअरच्या रूपात ठेवी स्वीकारायला सुरुवात केली. दरम्यान, ठेवींची मुदत संपल्याने खातेदारांनी रकमेची मागणी केली. त्यावर ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने ठेवीदारांनी सहनिबंधक व जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली. पतसंस्थेच्या संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांनाही सुरुवातीला सहकार्य केले नाही.
घोटाळा केल्याचे स्पष्ट होताच चौकशी अधिकारी प्रशांत बघेल यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. शरदचंद्र दास हे वेकोलिच्या भानेगाव येथील कोळसा खाणीत सुपरवायझरपदी कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते सिल्लेवाडा खाणीत कार्यरत होते. ते ठेवीदारांना नेहमीच पैसे मागायचे, असेही काहींनी सांगितले. ते पूर्वी सिल्लेवाडा येथील वेकोलि कॉलनीत राहायचे. दोन वषा्रंपूर्वी त्यांना वानाडोंगरी येथे फ्लॅट विकत घेतला असून, तिथे राहायला गेले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील सर्व आरोपी हे पतसंस्थेचे संचालक व वेकोलिचे कर्मचारी आहेत. त्या सर्वांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी तथा ठाणेदार अशोक साखरकर यांनी सांगितले.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी शरदचंद्र दास यांना शनिवारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोकाटे यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची अर्थात ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी युक्तीवादादरम्यान सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. या काळात त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करणे, कागदपत्र व रेकॉर्ड जप्त करणे, घोटाळ्यात लिप्त असलेल्या संचालकांसह इतरांची नावे माहिती करून त्यांना अटक करणे, त्या रकमेची विल्हेवाट कशी, कुठे व कधी लावली याबाबत पोलीस माहिती मिळविणार आहेत.