महसूल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय रजा आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:36+5:302021-02-05T04:37:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेती तस्करांनी ...

A one-day leave of absence for revenue officers | महसूल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय रजा आंदाेलन

महसूल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय रजा आंदाेलन

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ कामठी तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २) एक दिवसीय रजा आंदाेलन केले. हल्लेखाेरांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.

उमरखेडचे तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोसे हे २३ जानेवारीच्या रात्री ११ वाजताच्या उमरखेड-ढाकणी मार्गावर रेती वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करीत असताना रेती तस्करांनी या दाेघांवर चाकूने हल्ला चढवीत पाेटावर वार केले. या दाेघांवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसीय रजा आंदाेलन केले. त्यात विदर्भ तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यातील १०२ तहसीलदार व २३५ नायब तहसीलदार सहभागी झाले हाेते. त्यात कामठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या हल्लेखेरांना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर मकाेकाअंतर्गत कारवाई करावी, रेतीचाेरी राेखण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव करावा, रेतीघाटांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, यासह अन्य मागण्याही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत. या आंदाेलनात उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार सुनील तरुडकर, आर. टी. उके, रणजित दुसावार, श्याम कावटी यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.

...

रेती तस्कराची गुंडगिरी

रेतीचा अवैध उपसा आणि रेती तस्करांची गुंडगिरी प्रचंड वाढली आहे. काही दिवसापूर्वी काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत रेती तस्कराने नायब तहसीलदार सुनील तराेडकर व तलाठी खाेब्रागडे यांच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला हाेता. याप्रकरणी काेराडी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली. मात्र, आराेपीस अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेतील आराेपीला अटक करून कठाेर कारवाई करण्याची मागणीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: A one-day leave of absence for revenue officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.