देवेंद्र गोडबोले यांना एक दिवसाचा ‘पीसीआर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:39 PM2018-08-06T23:39:49+5:302018-08-06T23:40:40+5:30
उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना मौदा येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यांना घटनेच्या आठ दिवसानंतर रविवारी (दि. ५) सायंकाळी नागपूर शहरातून अटक करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना मौदा येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यांना घटनेच्या आठ दिवसानंतर रविवारी (दि. ५) सायंकाळी नागपूर शहरातून अटक करण्यात आली होती.
आढावा बैठकीत देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांनी एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमण लाल यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवरून वाद घालत प्रजापती यांना मारहाण केली होती. राजकुमार प्रजापती त्यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. दरम्यान, दोघांनाही रविवारी रात्री नागपूर शहरात अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी (दि. ६) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मौदा पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास मौदा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. पी. पांडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने अंदाजे दीड तास दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
परिणामी, या दोघांनाही मंगळवारी (दि. ७) दुपारी मौदा येथील न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी दोघांचेही जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जामिनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, नागरिकांनी सकाळी १० वाजतापासून न्यायालय परिसरात यायला सुरुवात केली होती. दुपारपर्यंत अंदाजे १६०० नागरिक गोळा झाले होते. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सरपंच व महिलांचाही समावेश होता.
न्यायालय परिसरात जमाव
न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र, कुणीही घोषणाबाजी किंवा नारेबाजी केली नाही. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हा जमाव देवेंद्र गोडबोले यांच्या मौदास्थित जनसंपर्क कार्यालयासमोर गेला. तिथे माजी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, वर्धराज पिल्ले यांनी नागरिकांना संबोधित केले.