वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’

By admin | Published: July 7, 2016 02:53 AM2016-07-07T02:53:36+5:302016-07-07T02:53:36+5:30

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दिवसात सेमिनरी हिल्स बालोद्यानमधील ‘वनबाला’ सुरू करण्याचे आदेश दिले.

One-day run for 'Vanu Ballala' | वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’

वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’

Next

ट्रॅक खराब असल्याचे कारण दिले : चिमुकल्यांसह पर्यटक पालकांची निराशा
नागपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दिवसात सेमिनरी हिल्स बालोद्यानमधील ‘वनबाला’ सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशाची तडकाफडकी अंमलबजावणी करीत वनविभागाने अनेक वर्षांपासून बंद असलेली वनबाला ही मिनी रेल्वेगाडी सुरू केली. लहान मुलांचे आकर्षण असलेली ही गाडी सुरू झाल्याचे वृत्त शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी प्रकाशित केले. यामुळे पर्यंटकांचा ओढा वाढला. परंतु दुसऱ्याच दिवशी ही ट्रेन पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकल्यांसह येथे येणारे पालक पर्यटक निराश होत आहेत. हा एकूणच प्रकार लक्षात घेता केवळ वनमंत्र्यांनी आदेश दिले म्हणून खानापूर्तीसाठी ही गाडी एक दिवस चालवण्यात आली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेमिनरी हिल्स येथील बालोद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ‘वनबाला’ ही ट्राय ट्रेन. मागील अनेक वर्षांपासून ही रेल्वेगाडी रुळावरच आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या बच्चे कंपनीचा चांगलाच हिरमोड व्हायचा. याबाबत अनेक पक्षांनी व विविध संघटनांनी वारंवार निवेदने दिली. आंदोलने केली. त्यानंतर वन विभागाने पाऊल उचलित कामाला सुरुवात केली. वनबालालाही नवीन रूप देण्यात आले. रेल्वे गाडीचे ट्रायल सुद्धा घेण्यात आले. परंतु वनबाला सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये असंतोष पसरत होता. मागील २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाची आढावा बैठक बोलावली होती. बैठक संपल्यावर मुनगंटीवार जायला निघाले तेव्हा काँग्रेस पक्षाचे आनंद तिवारी, सुनील चोपडा, राम कडंबे, आसीफ अंसारी, रिजवान खान, रुमी, राजू क्षेत्री, युगल विधावत, धीरज पांडे, भागवत गायकवाड, रिजवान शेख आदी कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना गुलाब पुष्प भेट देऊन वनबलाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तेव्हा वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेत वन विभागाच्या वरिष्ठ नेत्यांना ही वनबाला कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू झालीच पाहिजे, अशी ताकीद दिली.
खुद्द वनमंत्र्यांनी आदेश दिल्याने आता वनबाला सुरू होईल, असा विश्वास होता. झालेही तसेच. निवेदन देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते आणि पर्यटक नागरिक मोठ्या संख्येने वनबालातून सैर करण्यासाठी हजर होते. गार्गी नावाच्या एका चिमुकलीच्या हस्ते वनबालाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले, तेव्हा सेमिनरी हिल्सचे आकर्षण पुन्न्हा परतल्याचा प्रत्यय आला. शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी वनबाला सुरू झाल्याचे वृत्त प्रकर्षाने प्रकाशित केले.
नागपूरकरांनाही याचा चांगलाच आनंद झाला. परिणामी सेमिनरी हिल्स आणि विशेषत: वनबालातून सैर करण्यासाठी बच्चे कंपनीसह पालकांनी गर्दी करायला सुरुवात केली.

रेल्वे ट्रॅक खराब
वनबालाच्या प्लॅटफॉर्मच्या तिकीट काऊंटरच्या दरवाजाच्या वर एक कागद चिकटविला आहे. त्यावर रेल्वे ट्रॅक खराबअसल्याने वनबाला बंद असल्याचे लिहून ठेवले आहे. रेल्वे ट्रॅक खराब होता तर मग त्यावरून वनमंत्र्यांनी सांगितल्यावर एक दिवसासाठी वनबाला चालवण्यात आलीच कशी. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब वनमंत्र्यांच्या निदर्शनास का आणून दिली नाही. गडी चालवून लहान मुलांच्या जीवाशी का खेळले गेला असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे.

Web Title: One-day run for 'Vanu Ballala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.