नागपूर महानगरपालिकेच्या ‘त्या’ ६६ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:25 PM2020-09-03T20:25:53+5:302020-09-03T20:26:25+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांनी ‘कारणे द्या’ नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी अचानक पाहणी केली असता ६६ कर्मचारी ड्युटीवर उशिरा आल्याचे आणि सूचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आले होते. या कर्मचाऱ्यांनी ‘कारणे द्या’ नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयातील वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पाहणी केली होती. या विभागातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नसल्याचे निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर काही कर्मचारी रजेवर होते. चौकशी केली असता त्यांनी रजेचा कुठलाही अर्ज दिलेला नव्हता अथवा त्यांच्या रजेला पूर्वपरवानगी नव्हती.
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी उशिरा येण्याला सुरुवात केली होती. मात्र राधाकृष्णन बी. यांनी एकाच वेळी ६६ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने. लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
झोन कार्यालयातही कारवाईची गरज
महापालिकेच्या दहा झोनमधील कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुख्यालयाप्रमाणे झोन कार्यालयातील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
शिस्त न पाळल्यास कारवाई
कार्यालयात वेळेत उपस्थित होणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. त्यात कुठलीही कसूर चालणार नाही. त्यामुळे मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.