सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 01:04 AM2020-09-24T01:04:19+5:302020-09-24T01:21:32+5:30
सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी बंददरम्यान केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी बंददरम्यान केला.
दुकानदार हुसेन अजानी यांनी सांगितले, सीताबर्डी मेनरोडवर ७०० पेक्षा जास्त अवैध हॉकर्स अरेरावी करून व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री हॉकर्सनी अवैधरित्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर स्वत:च्या व्यवसायासाठी चार बाय चार आकाराचे चुन्याने डब्बे आखले. त्यावरून रात्रीच दुकानदार आणि हॉकर्समध्ये तणाव निर्माण झाला. मेनरोडवरील दुकाने बंद करण्याचा हॉकर्सचा डाव व्यापाऱ्यांनी हाणून पाडताना बुधवारी सकाळी सर्वच दुकानदारांनीआपापली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दुकानदारांच्या कृतीला न जुमानता हॉकर्सनी मोर्चा काढून दुकानदारांविरुद्ध नारेबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुकानदारांनीही हॉकर्सला विरोध केला.
अजानी म्हणाले, पूर्वी १०८ वैध हॉकर्स होते. ही संख्या ७०० वर गेली असून दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. हॉकर्समुळे आमच्यावर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. लहानसहान गोष्टीवरून हॉकर्स अरेरावीवर उतरतात आणि थेट धमकी देतात. यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. बुधवारी पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी मध्यस्थी करून हॉकर्सना पिटाळून लावले. या संदर्भात सीताबर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीही मध्यस्थी केली. यापुढे हॉकर्सची मनमानी व अरेरावी चालू देणार नाही आणि एकजुटीने त्यांचा विरोध करू, असे अजानी यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल
सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॉकर गोपीचंद आंभुरे, विनायक तिरपुडे, दुर्गाप्रसाद केवलरामानी, संदीप साहू, हेमंत गोतमाांगे, नरेश ढगे,राजेश चंदू अग्रवाल, आतिक अंसारी आणि त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच व्यापाºयांमध्ये हुसेन, किसन अग्रवाल, प्रदीप गुप्ता, विजय अग्रवल, प्रजोत देशपांडे, किसन मांगवानी, पराग ठक्कर, मंसुर अंसारी, नारायण चौरसिया, अर्जीन भोजवानी आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यापारी गुरुवारी यासंदर्भात पोलीस आणि मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकून हॉकर्सना मदत केली जात आहे.