नागपुरातील भांडेवाडी परिसरात सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:21 PM2018-07-19T23:21:53+5:302018-07-19T23:22:42+5:30
कळमन्यातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या भाजले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या भाजले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.
पारडीजवळच्या भांडेवाडी परिसरात स्वागतनगर आहे. तेथील रहिवासी दत्तू लक्ष्मण हुरकुडे (वय ७०) हे एका विशिष्ट धार्मिक समूहाशी जुळले होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरात पूजा ठेवली होती. त्यामुळे त्यांचे आप्तस्वकिीय तेथे पोहचले. मोठ्या हॉलमध्ये पूजा सुरू असताना सिलिंडरचा स्फोट झाला. विशेष म्हणजे, जेथे पूजा सुरू होती तेथे पेट्रोलने भरलेल्या मोठ्या डबक्या होत्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात भाजून हुरकुडे, प्रकाश हुरकुडे (वय ३५), भाडेकरू हेमराज पडोळे (वय ३०), रोशन सदाशिव उके (वय २४), कुलदीप आणि धनराज नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी तेथे जमली. माहिती कळताच कळमना पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल बरडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तोपर्यंत सर्व जखमींना मेयोत नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी दत्तू हुरकुडे यांना मृत घोषित केले. दरम्यान, तेथे सिलिंडरचा स्फोट झालाच नाही, तशी अफवा होती. पेट्रोलच्या डबक्या जवळ असल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या आजूबाजूच्यांनी आम्हाला सांगितले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकरी बरडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आजूबाजूच्या मंडळींनी मात्र सिलिंडरचा स्फोट झाल्याचेच सर्वांना सांगितले .
मेयोमध्ये चार जणांवर उपचार
भांडेवाडी येथे झालेल्या सिलिंडरच्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच जणांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारासाठी आणले असता यातील एकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जणांवर उपचार सुरू आहेत. यात रोशन उके (२७), प्रकाश उरकुडे (३८), हेमराज (३०), कुलदीप (२०) यांच्यावर सर्जिकल कॉम्प्लेक्समधील जळीत वॉर्डात उपचार सुरु आहे. हे सर्व रुग्ण ४० ते ६० टक्के जळाले असून कुलदीप याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.