तंबाखूमुळे दर ६ सेकंदाला एकाचा मृत्यू
By admin | Published: May 31, 2017 02:59 AM2017-05-31T02:59:02+5:302017-05-31T02:59:02+5:30
तंबाखूच्या सवयीमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो, यात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो.
२०३० पर्यंत वर्षाला ८० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता : तंबाखूच्या सेवनामुळे ३० टक्के कॅन्सर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंबाखूच्या सवयीमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो, यात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो. ही आकडेवारी क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स व मलेरियाच्या तुलनेत अधिक आहे. हा आकडा २०३०पर्यंत प्रतिवर्ष ८० लाख होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, जगात तंबाखूमुळे दर सहा सेकंदाला एकाचा मृत्यू होतो.
३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी. के. शर्मा यांनी तंबाखूशी संबंधित माहिती उपलब्ध करून दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर) भारतात पुरुष आणि महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये ३० टक्के कॅन्सर हा तंबाखूच्या सेवनामुळे होतो. मुखाचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळतो. तंबाखूशी संबंधित कॅन्सरमुळे ४२ टक्के पुरुषांचा मृत्यू तर १८.३० टक्के महिलांचा मृत्यू होतो. ‘कॅनेडियन कॅन्सर सोसायटी’च्या अहवालानुसार भारताला २०१२मध्ये आरोग्यसंबंधी इशारा देण्यात आला होता. त्यावेळी १९८ देशांमध्ये भारताचे स्थान १२३ होते ते आता १३६ स्थानी पोहचले आहे.
तंबाखूमधील ६९ घटक देतात कॅन्सरला आमंत्रण
तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारी असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य कारण ठरत आहे. अन्य आजारांमध्ये व्यंधत्व, पेप्टीक अल्सर यालाही कारणीभूत ठरते. धूम्रपानामुळे रक्तामधील आॅक्सिजनची मात्रा कमी होते.
नागपूरच्या शा. दंत महाविद्यालयात वाढले रुग्ण
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखूमुळे मुखकर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष म्हणजे, २००७ मध्ये मुखपूर्वकर्करोगाचे ४१५ रुग्ण होते, २००८ मध्ये यात किंचित घट होऊन ३२३वर आली. परंतु २०१२ पासून या रोगाची रुग्ण संख्या वाढतच गेली. २०१६ मध्ये याच्या अडीचपट म्हणजे १५४७ रुग्णांवर पोहचली आहे.
मुखकर्करोग रुग्णाच्या संख्येत दुपटीने वाढ
दंत रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार २००७ मध्ये मुखकर्करोगाचे ५९ रुग्णांचे निदान झाले. मात्र २०१३ पासून ही संख्या वाढली. २०१४ मध्ये ९१ रुग्ण, २०१५ मध्ये ११२ रुग्ण तर २०१६ मध्ये यात दुप्पटीने वाढ होऊन मुखकर्करोगाची संख्या २६६वर पोहचली. गेल्या दहा वर्षांत रुग्णालयाला या रोगाचे ९१५ रुग्ण आढळून आले आहे.