नागपुरात न येताच एका उपायुक्तांची बदली, तर दुसऱ्यांची रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:24 PM2022-11-09T20:24:05+5:302022-11-09T20:24:46+5:30
गृहविभागाने तडकाफडकी बदलले निर्देश
नागपूर: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूरला सोमवारी सहा नवे पोलीस उपायुक्त मिळाल्याने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, नागपुरात रूजू न होताच एका पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली तर एकाची बदलीच रद्द करण्यात आली. त्या बदल्यात नागपूरला श्वेता खेडकर यांच्या रूपाने नवीन पोलीस उपायुक्त मिळाल्या आहेत.
दोन आठवड्यांअगोदर शहरातील उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर, काही दिवसांअगोदर दोन पोलीस उपायुक्त पदोन्नतीने मिळाले. मात्र, तरीही चार जागा रिक्त होत्या. गृहविभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार नागपूरला मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, अनुराग जैन, गोरख भामरे, श्रवण दत्त, सुनील लोखंडे या सहा अधिकाऱ्यांची नागपुरात पोलीस उपायुक्तपदी बदली झाली. मात्र, मंगळवारी गृहविभागाने नवे आदेश जारी केले.
त्यानुसार धोंडोपंत स्वामी यांची मुंबईच्या परिमंडळ-८ च्या उपायुक्तपदावरून झालेली बदली रद्द करण्यात आली तर सुनील लोखंडे यांची नागपूर पोलीस उपायुक्तपदावरून ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. श्वेता खेडकर या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांची नागपूरला उपायुक्तपदी बदली झाली आहे. एका दिवसात बदली रद्द होणे व एकाची बदली होणे त्यामुळे पोलीस विभागात विविध चर्चांना उधाण आले आहे.