चार पदाचा कार्यभार सांभाळतो एक कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:09+5:302021-03-05T04:09:09+5:30
कळमेश्वर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कळमेश्वर येथे चार पदे मंजूर आहेत. ...
कळमेश्वर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती कळमेश्वर येथे चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील चारही पदाचा कार्यभार एकाच कर्मचाऱ्यावर आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज व्यवस्थेत पंचायत समितीअंतर्गत अनेक उपक्रम राबविले जातात. समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध बाबींची माहिती देत सज्ञान करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जातात. यात भर पडावी म्हणून राज्य शासनाने ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब, वंचित, अनुसूचित जाती-जमाती, विधवा, अपंग, एकल महिला कुटुंबातील महिलाचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट तयार करण्यात येत असून, त्या गटांना शासनाकडून रोजगार निर्मितीसाठी अनुदान देणे, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, त्या कर्जाच्या व्याजावर अनुदान देणे, महिलांसाठी रोजगार निर्मिती करून देण्याचे अनेक उपक्रम राबविले जातात. याकरिता तालुका अभियान व्यवस्थापन १ व तालुका व्यवस्थापकाची ३ पदे निर्माण करण्यात आली आहेत. यापैकी तालुका अभियान व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापकाची २ पदे मागील दोन वर्षापासून रिक्त आहेत. या सर्व पदांचा अतिरिक्त कार्यभार तालुका व्यवस्थापक प्रशांत धोटे या एकाच कर्मचाऱ्याकडे आहे. यामुळे तालुक्यातील बचत गटाचा डोलारा सावरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.