धूम्रपान करणाऱ्या चारपैकी एकाला ‘सीओपीडी’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:22 PM2018-05-28T23:22:48+5:302018-05-28T23:28:13+5:30
भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) धोका निर्माण करण्यामागील धोकादायक घटकांपैकी एक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) धोका निर्माण करण्यामागील धोकादायक घटकांपैकी एक आहे. सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चार जणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ होण्याचा धोका असतो. धूम्रपान करणाºयांना ‘सीओपीडी’ होण्याचा धोका तिप्पट असतो, तर धूम्रपान करणा ऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत असल्याचे छातीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
३१ मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी शहरातील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट व डॉ. विक्रम राठी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सीओपीडी’, हृदय व हृदयरक्तवाहिनीसंबंधी आजार (कार्डिओव्हस्क्युलर डिसीज) आणि फुफ्फुसांचा कर्करोग यासाठी धूम्रपान हा एक प्रमुख घटक आहे. परंतु धूम्रपान सोडल्यास फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका ५० टक्क्याने कमी होतो. सध्या तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये धूम्रपानाद्वारे तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण ३५.१ टक्के आहे.
धूम्रपानाद्वारे तंबाखू घेणारे सात हजाराहून अधिक रसायनांच्या संपर्कात
तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानाद्वारे तंबाखू घेणारे सात हजाराहून अधिक रसायनांच्या संपर्कात येतात. यातील सुमारे २५० रसायने घातक, तर सुमारे ६९ रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरणारी असतात. भारतात आढळणा ऱ्या एकूण कर्करुग्णांमध्ये ३० टक्के मुखाचा तसेच फुफ्फुसांचा कर्करोग झालेले असतात.
धूम्रपान करणाऱ्यांच्या फुफ्फुसांची, श्वसनमार्गातील भागांची हानी होते. रक्तदाब वाढतो आणि शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाणही कमी होते.
धूम्रपानामुळे मृत्यूचा धोका १४ पट
धूम्रपानामुळे फुफ्फुसे, घसा किंवा मुखाच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका १४ पटीने वाढतो. अन्ननलिकेच्या कर्करोगाने मृत्यूचा धोका चारपटीने वाढतो. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचा धोका दुप्पट तर मूत्राशयाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोकाही दुप्पटीने वाढतो.
धूम्रपानाची सवय मोडणे शक्य
धूम्रपानाची सवय मोडणे कठीण असलेतरी ते शक्य आहे. तंबाखूतील रासायनिक उत्तेजित घटक ‘निकोटिन’ हा व्यसन लावणारा घटक आहे. यामुळे याची तीव्र इच्छा होत राहते. परंतु सुदैवाने ही तीव्र इच्छा आणि निकोटिन सोडल्यानंतर दिसणारी लक्षणे यांच्यावर नियंत्रण मिळविण्यास मदत करणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.
डॉ. अशोक अरबट
प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ
धूम्रपान न करता रक्तप्रवाहामध्ये निकोटीन सोडणारी पद्धत
निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये (एनआरटी) म्हणजे धूम्रपान न करता रक्तप्रवाहामध्ये निकोटिन सोडणारी उपचारपद्धती आहे. सिगारेटमध्ये आढळणाऱ्या निकोटिनच्या तुलनेत एक तृतीयांश ते निम्मे निकोटिन या उपचारपद्धतीत वापरले जाते. याशिवाय अनेक पयार्यही उपलब्ध आहेत.
डॉ. विक्रम राठी
प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ