नागपूर जिल्ह्यातील एक ग्रा. पं. हरवली, शोधणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:20 AM2018-08-28T10:20:26+5:302018-08-28T10:23:11+5:30
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे.
जितेंद्र ढवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २६ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होईल. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामपंचायती वास्तवात हरविल्या की कागदी घोडे नाचविताना कुणाच्या हाताने ही प्रशासकीय चूक झाली, हे सध्याच स्पष्ट झाले नाही.
ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने एक पत्रक जारी केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या ७६८ इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६३), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५८), नागपूर ग्रामीण(६७) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं.असल्याचे नमूद आहे. इकडे निवडणूक अधिकारी नगर पंचायत, नागपूर कार्यालयाने जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राची प्रत माध्यमांना पुरविली आहे. यात नागपूर जिल्ह्यात एकूण ७६९ ग्रा.पं.असल्याचे नमूद केले आहे.
त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६२), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५९), नागपूर ग्रामीण (६८) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं. असल्याचे नमूद केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या ग्रामपंचायतींच्या यादीत एका ग्रामपंचायतीचा फरक आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत हरविली का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
इकडे जि.प.च्या संकेतस्थळावर जिल्ह्यात ७७० ग्रा.प.असल्याचे नमूद करण्यात आल्याने हा गोंधळ आणखी वाढला आहे.
मौदा, कुही, नागपूर ग्रामीणमध्ये घोळ
जि.प.च्या मुख्य कार्यकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात ग्रामपंचायतीचा घोळ मौदा, कुही आणि नागपूर ग्रामीण तालुक्यात दिसून येतो. कदाचित हा घोळ तांत्रिक स्वरुपाचा असावा. मात्र डिजिटल नागपूर जिल्ह्यातील या घोळामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत कमी झाली की वाढली याबाबत संभ्रम आहे.