नागपुरात लोकसहभागातून एक घर, दोन वृक्ष मोहीम : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:09 PM2019-06-15T21:09:21+5:302019-06-15T21:13:42+5:30
यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक, प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, जिल्हा वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, उपायुक्त के.एन.के. राव तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ज्या विभागांकडे वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध नाही अशा सर्व विभागांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वृक्षारोपण करताना सार्वजनिक ठिकाणी वृक्षाचे संगोपन व्हावे, यासाठी ट्री-गार्डचा वापर बंधनकारक करण्यात यावा. वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीसंंबंधीची संपूर्ण माहिती वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच वृक्षारोपणासंबंधी व्हिडिओग्राफी करून ती सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे.
सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी वृक्षारोपण मोहिमेचा विभागनिहाय आढावा घेताना या मोहिमेसाठी विभागांनी केलेले नियोजन तसेच ऑनलाईन सादर केलेली माहिती याचा आढावा घेतला, जिल्ह्यातील खासगी शाळा-महाविद्यालये यांनाही वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट देऊन त्यानुसार या मोहिमेत जास्तीतजास्त वृक्षांची लागवड होईल, यादृष्टीने विभागप्रमुखांना सूचना दिल्या.
मोहिमेतील प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग
वृक्षारोपण मोहीम यशस्वी करताना प्रत्येक लावलेल्या रोपट्याचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी संबंधित विभागांकडे राहणार असून, प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १५ लाख ८५ हजार ८८२ झाडे लावण्यात आली असून, त्यापैकी १३ लाख १५ हजार ४६३ झाडे जिवंत असून, सरासरी ८३ टक्के झाडे जिवंत आहेत. याच पद्धतीने या मोहिमेतही वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देऊन प्रत्येक लावलेले झाड जिवंत राहील यादृष्टीने नियोजन करावे,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
असे आहे नियोजन
वृक्षारोपण मोहिमेचे संपूर्ण नियोजन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात आले आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी विविध नर्सरीमार्फत वृक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण मोहिमेसाठी आतापर्यंत ६८ लाख २६ हजार खड्डे पूर्ण झाले आहेत. वृक्षारोपण मोहीम जिल्ह्यातील ७ हजार ६०६ ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नद्या व उपनद्यांच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात येणार आहेत. यामध्ये कन्हान, पेंच, वैनगंगा व वर्धा नदीच्या सुमारे ३२७ किलोमीटर लांबीच्या परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या झाडांची उपलब्धता व्हावी, यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण तसेच एफडीसीएम यांच्याकडे ७० रोपवाटिकेत ४० लाख ५३ हजार वृक्ष उपलब्ध आहेत. तसेच जिल्ह्यात मागील वर्षी तयार केलेले ३४ लाख ५ हजार वृक्ष असे एकूण ७५ लाख वृक्ष या मोहिमेसाठी उपलब्ध आहेत.
- प्रादेशिक वन विभाग २६ लाख ६२ हजार वृक्ष लावणार
- सामाजिक वनीकरण विभाग १५ लाख वृक्ष लावणार
- महाराष्ट्र वन विभाग ५ लाख ८१ हजार वृक्ष लावणार
- ग्रामपंचायती २५ लाख ६ हजार वृक्ष लावणार
- इतर सर्व विभाग मिळून २५ लाख ९० हजार वृक्ष लावतील
केंद्र सरकारचे विभाग
- ऑर्डनन्स फॅक्टरी २५ हजार
- वेकोलि ८० हजार
- मॉईल १५ हजार
- एनटीपीसी ५ हजार
- कॉन्कर ३ हजार
- एफसीआय ५ हजार
- कॉटन रिसर्च सेंटर ३ हजार
- रेल्वे ३० हजार वृक्ष लावणार