शंभर टक्के शिक्षकांनी घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:44+5:302021-09-02T04:15:44+5:30
नागपूर : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना ...
नागपूर : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंत डेडलाइन दिली आहे. नागपूर जिल्ह्यात एक-दोन शिक्षक अपवादाने सोडल्यास १०० टक्के शिक्षकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, मोजकेच शिक्षक दुसरा डोस घेणे बाकी आहेत, असा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षण विभाग आता शिक्षकांच्या लसीकरणाचा आढावा घेत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासनाने ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू केल्या. काही कारणास्तव अजूनही ३० टक्के शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत; परंतु महापालिकेच्या हद्दीतील एकही शाळा अजूनही सुरू होऊ शकली नाही. शासनाने जेव्हा जेव्हा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या अनिवार्य केल्या होत्या. जुलै महिन्यात शाळा सुरू करीत असताना शिक्षकांचे लसीकरणही बंधनकारक केले होते. नागपूर जिल्ह्यात पहिला डोस १०० टक्के शिक्षकांचा झाल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे. दुसऱ्या डोसपासून १० ते १२ टक्के शिक्षक वंचित असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामागची कारणे म्हणजे आजारपण किंवा एखाद्याला लसीकरणावर विश्वासच नाही, अशी आहेत; परंतु आता राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेण्याची सक्ती केली आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत डेडलाइन दिली आहे.
- जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांचा आढावा
संस्था शाळा शिक्षक
जिल्हा परिषद १५३० ४४००
नगर परिषद ६८ ५२४
महापालिका १५६ १२४९
अनुदानित शाळा १२०३ १४९७२
विना अनुदानित शाळा ११५५ १३४५०
(नोट : शिक्षण विभागाकडून लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे.)
- कोरोनाच्या काळात शासनाने जेवढी कामे शिक्षकांना लावली. तेवढी कुठल्याही विभागातील कर्मचाऱ्यांना लावली नाही. ही कामे करीत असताना वेळोवेळी दिलेले खबरदारीचे निर्देश शिक्षकांनी १०० टक्के पाळले. विशेष म्हणजे समाजामध्ये लसीकरणाची जाणीव जागृती केलीच, उलट लसीकरण केंद्रावर नोकरीसुद्धा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरिता शिक्षकांनी १०० टक्के लसीकरण केले आहे.
-अनिल शिवणकर, विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी
- सध्या शाळा जरी बंद असल्या, तरी शिक्षकांना शाळेत जावेच लागत आहे. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार लसीकरण करणे शिक्षकांना बंधनकारकच होते. त्यामुळे एखादा अपवाद सोडल्यास बहुतांश शिक्षकांनी लसीकरण केले आहे.
-लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, नागपूर जि.प.