काेव्हिडनंतर जगातील १० पैकी एक व्यक्ती नैराश्याने ग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 08:46 AM2023-01-05T08:46:00+5:302023-01-05T08:50:01+5:30
Nagpur News १० पैकी एक व्यक्ती ‘ब्रेन फाॅल’च्या समस्येने ग्रस्त आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ओमाहा इनसाेम्निया अॅण्ड सायकॅट्रिक सर्व्हिसच्या व्यवस्थापकीय संचालक डाॅ. विद्यालक्ष्मी सेल्वराज यांनी दिली.
निशांत वानखेडे
नागपूर : काेव्हिड महामारीनंतर मानसिक आराेग्याची समस्या अधिक प्रकर्षाने अधाेरेखित झाली आहे. सामान्य नागरिकच नाही तर डाॅक्टर्स, नर्सेस अशा फ्रंटलाइन वर्कर्सही नैराश्य, निरुत्साह, निद्रानाश अशा समस्यांचा सामना करीत असून ही समस्या अधिक तीव्र हाेत आहे. १० पैकी एक व्यक्ती ‘ब्रेन फाॅल’च्या समस्येने ग्रस्त आहे, अशी माहिती अमेरिकेच्या ओमाहा इनसाेम्निया अॅण्ड सायकॅट्रिक सर्व्हिसच्या व्यवस्थापकीय संचालक डाॅ. विद्यालक्ष्मी सेल्वराज यांनी दिली.
इंडियन सायन्स काँग्रेससाठी नागपूरला आलेल्या डाॅ. सेल्वराज यांनी लाेकमतला ‘पाेस्ट काेविड’ मानसिक आराेग्याची माहिती दिली. त्यांच्या मते नैराश्य इतके आहे की, नवीन तरुण डाॅक्टर किंवा नर्स हाेण्याकडे पाठ फिरवत आहेत. काेराेनानंतर काही महिने स्थिती नियंत्रणाबाहेर हाेती. सामान्य नागरिकांसह आराेग्य सेवकांच्याही आत्महत्या अचानक वाढल्या हाेत्या. आता स्थिती सुधारली असली तरी नैराश्य, निद्रानाशाचा प्रभाव कायम आहे. काेराेना काळात एकटेपणा, संवादाचा अभाव, नाेकऱ्या गमावणे अशा समस्या वादळाप्रमाणे आल्या. लाेकांना काय करावे, कुठे जावे समजेनासे झाले हाेते. हा एक प्रकारचा उद्रेकच हाेता.
डाॅ. सेल्वराज यांच्यासाठी भारतातील पारंपरिक परिस्थिती अधिक कारणीभूत ठरली. लाेक सामाजिक भीतीमुळे मानसाेपचारतज्ज्ञाकडे जात नाही. त्यामुळे सध्यातरी ही समस्या आपसात साेडविण्याची गरज आहे. लाेकांनी एकमेकांशी संवाद वाढवावा, कुटुंबातील निराशाग्रस्त व्यक्तीला मदत करा, त्यांच्या समस्या विचारा, एकमेकांना समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय मानसिक आराेग्य धाेरणाची गरज
मानसिक आराेग्याबाबत भारताची स्थिती वाईट असल्याचे मत डाॅ. सेल्वराज यांनी व्यक्त केले. सरकारने या समस्येची गंभीरता समजावी आणि राष्ट्रीय मानसिक आराेग्य धाेरण राबवावे, असे आवाहन त्यांनी केले. एड्स, टीबी, पाेलिओ याप्रमाणे व्यापक जनजागृती अभियान राबविण्याची गरज आहे. एलिमेंटरी स्कूलसारखी संकल्पना राबवावी. शाळा-महाविद्यालयात याबाबत प्रचार करावा, जेणेकरून लाेक ‘टॅबू’ न बाळगता सहज मानसाेपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतील. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये हे अभियान आधीच सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अस्वच्छ वातावरणामुळे म्युकर मायकाेसिसचा उद्रेक : तनू सिंघल
काेकिलाबेन अंबानी रुग्णालय, मुंबईच्या संसर्ग आजारतज्ज्ञ व बालराेगतज्ज्ञ डाॅ. तनू सिंघल यांनी काेराेनानंतर म्युकर मायकाेसिस च्या उद्रेकावर प्रकाश टाकला. दुसऱ्या लाटेदरम्यान डिसेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत भारतात ५५ हजारांच्यावर म्युकर मायकाेसिसचे रुग्ण नाेंदविण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये हे प्रमाण अधिक हाेते. काही देशी-विदेशी अभ्यासानुसार उद्रेकाच्या अनेक कारणांपैकी काेराेना उपचारासाठी स्टेराॅइडचा अतिवापर आणि घर व रुग्णालयातील अस्वच्छ वातावरण प्रमुख कारण ठरल्याचे डाॅ. सिंघल यांनी सांगितले. म्युकरच्या केसेस आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.