नागपुरात भीषण अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:17 PM2018-12-08T22:17:33+5:302018-12-08T22:21:17+5:30

नातेवाईकांकडे लग्नापूर्वी असलेल्या पूजेसाठी जात असताना मागून आलेल्या ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे स्प्लेंडर मोटरसायकलरील एका व्यक्तीचा करुण अंत झाला. त्याचा १२ वर्षांचा मुलगा आणि मोठा भाऊ बालंबाल बचावले. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला संतप्त जमावाने पकडून त्याची बेदम धुलाई केली.

One killed in a road accident in Nagpur | नागपुरात भीषण अपघातात एक ठार

नागपुरात भीषण अपघातात एक ठार

Next
ठळक मुद्देमुलगा, भाऊ बचावलेमानेवाड्यात तणाव, ट्रकचालकाची धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नातेवाईकांकडे लग्नापूर्वी असलेल्या पूजेसाठी जात असताना मागून आलेल्या ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे स्प्लेंडर मोटरसायकलरील एका व्यक्तीचा करुण अंत झाला. त्याचा १२ वर्षांचा मुलगा आणि मोठा भाऊ बालंबाल बचावले. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला संतप्त जमावाने पकडून त्याची बेदम धुलाई केली.
सतीशसिंग प्रेमसिंग राजपूत (वय ४०) असे मृताचे नाव आहे. ते रामपूर (जि. जबलपूर, मध्यप्रदेश) येथील रहिवासी होते. सतीशसिंग यांचे मोठे बंधू उमाकांत प्रेमसिंग राजपूत (वय ५१) हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात राहतात. तर, त्यांचे नातेवाईक बेसा येथील श्रीकृष्णनगरात राहतात. त्यांच्याकडे लग्न समारंभ असल्याने त्यासाठी सतीशसिंग त्यांच्या परिवारासह नागपुरात आले होते. ते हिंगणा मार्गावर राहणाऱ्या मोठ्या भावाकडे थांबले होते. शनिवारी दुपारी पूजेच्या निमित्ताने उमाकांत यांच्या स्प्लेंडरवर बसून सतीशसिंग तसेच त्यांचा मुलगा सर्वजीतसिंग (वय १२) बेसाकडे निघाले. दुपारी २ च्या सुमारास ते मानेवाडा चौकाजवळून जात असताना मागून वेगात आलेल्या ट्रक (एमएच ३०/ एव्ही ४८२) च्या चालकाने राजपूत यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे सतीशसिंग, त्यांचा मुलगा सर्वजीतसिंग आणि भाऊ उमाकांत तिघेही खाली पडून जबर जखमी झाले. सतीशसिंग मागे बसून होते. त्यामुळे त्यांना जास्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने तेथे मोठी गर्दी जमली. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक पळून जात असल्याचे पाहून जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची बेदम धुलाई केली.
मुलाला जबर मानसिक धक्का
अपघाताची माहिती कळताच अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. वाहतुकीलाही अडसर निर्माण झाला होता. दगड भिरकावणारांना पळवून लावत पोलिसांनी जमावाला कसेबसे शांत केले. त्यांच्या ताब्यातून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. डोळ्यादेखत वडील ठार झाल्याने सतीशसिंग यांचा मुलगा सर्वजीतसिंग याला जबर मानसिक धक्का बसला आहे. अपघातात त्याला जास्त दुखापत झाली नाही. मात्र, उमाकांत यांनाही जबर दुखापत झाली असून, वृत्त लिहिस्तोवर आरोपीचालकाचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही.

 

Web Title: One killed in a road accident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.